शिवसेना-भाजपामध्ये मिलीभगत
By Admin | Published: February 19, 2017 11:40 PM2017-02-19T23:40:33+5:302017-02-19T23:40:53+5:30
अशोक चव्हाण : न्यायडोंगरी, काजीसांगवीत सभा
न्यायडोंगरी : महाराष्ट्रात शिवसेना- भाजपामध्ये मिलीभगत असून, आपण दोघे भाऊ भाऊ दोघे मिळून वाटून खाऊ अशी त्यांची स्थिती आहे़ तेव्हा खरोखर सर्वसामान्याची चाड असेल तर सेनेच्या मंत्र्यांनी राजीनामे देऊन सत्तेतून बाहेर पडावे नंतर नैतिकतेच्या गोष्टी कराव्या असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी न्यायडोंगरी येथील जाहिर सभेत केले
न्यायडोंगरी येथे कॉँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. चव्हाण पुढे म्हणाले, कुस्तीच्या आखाड्यात तेल लावून उतरतात यातील कोण जिंकणार व कोण पराभूत होईल याची उत्सुकता सर्वसामान्य जनतेला लागलेली असते, परंतु दोन्ही मल्लांनी अगोदरच ठरविलेले असते. आज तू पराभूत हो मी जिंकेल नंतर आपसात मिळालेला इनाम वाटून घेऊ अशा प्रकारचा कारभार युती शासनाचा सुरू असल्याचा आरोप केला. या सभेच्या व्यसपीठावर आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार अनिल अहेर, प्रदेश निरीक्षक प्रदीप पवार यासह तालुक्यातील, गट-गणातील उमेदवार उपस्थित होते़ काजीसांगवी येथे सभा
चांदवड : भाजपा- शिवसेना सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेत असून, महाराष्ट्र राज्यातील शेतकरी देशोधडीला लावला जात आहे. भाजपा-सेनेच्या सरकारमध्ये हिंमत असेल त्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करुन त्यांचा सातबारा कोरा करुन दाखवावा, असे आवाहन राष्ट्रीय कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. ते रविवारी चांदवड तालुक्यातील तळेगावरोही गटातील जिल्हा परिषद आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काजीसांगवी येथील जाहीर सभेत बोलत होते. पुढे ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तेथील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन देत आहे. मग महाराष्ट्रातील भाजपा-सेना सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी का देत नाही असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. फडवणीस सरकारला धडा शिकविण्यासाठी राष्ट्रीय कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी भाजपा उमेदवारांचा खरपूस समाचार घेतला. प्रचार सभेत जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, माजी आमदार उत्तम बाबा भालेराव, खंडेराव अहेर, डॉ. सयाजीराव गायकवाड, शहाजी भोकनळ, मीनाताई कोतवाल, दत्तात्रय वाकचौरे, तालुकाध्यक्ष संजय दगुजी जाधव आदि उपस्थित होते.