गिरीष महाजन यांनी सेनेच्या संजय राऊतांना ठरविले खोटे
By श्याम बागुल | Published: September 7, 2019 06:35 PM2019-09-07T18:35:39+5:302019-09-07T18:39:10+5:30
पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे यांच्यात जो पर्यंत अंतीम बोलणी होत नाही तोपावेतो कोणाच्याही बोलण्याला काहीही अर्थ नाही.
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या वेळीच युतीचा फार्म्युला फिफ्टी फिफ्टी ठरलेला असल्याने पुन्हा फार्म्यला ठरविण्याची गरज नाही असे दोन दिवसांपुर्वी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जाहीर केलेले असताना पालकमंत्री गिरीष महाजन यांनी मात्र अशा प्रकारचा कोणताही फार्म्युला ठरलेला नसून फक्त युती करण्याचे ठरले असून, लवकरच जागा व मतदार संघ वाटपाची अंतीम बोलणी केली जाईल असे सांगून राऊत यांना खोटे ठरविले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या जनादेश समारोप यात्रेसाठी तपोवनातील जागेची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. सेनेचे खासदार संजय राऊत यांनी जागा वाटपाचा फार्म्युला लोकसभेसाठी भाजप-सेनेची युती झाली तेव्हाच पक्षाध्यक्ष अमीत शाह यांच्या उपस्थितीत ठरला असून, जागा व सत्ता फिफ्टी फिफ्टी वाटप करण्याचे ठरल्याचे सांगितले होते. त्याबाबत महाजन यांना विचारणा केली असता, त्यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला. ते म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती संदर्भात चर्चा सुरू झाली आहे. गेल्या आठवड्याात रामदास आठवले, महादेव जानकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा व बैठका झाल्या आहेत. तसेच चंद्रकांतदादा पाटील मी स्वत: आणि सुभाष देसाई अशी चर्चा झाली आहे. मित्रपक्षात जागावाटपात कोणतेही मतभेद नाहीत. लवकरच भाजप सेनेच्या जागावाटपाला सुरुवात होणार असून, त्यात तोडगा निघेल युतीत कोणतीही अडचण येणार नाही. मात्र जागा वाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे यांच्यात जो पर्यंत अंतीम बोलणी होत नाही तोपावेतो कोणाच्याही बोलण्याला काहीही अर्थ नाही. कोणी म्हणते मुख्यमंत्री ठरला, फिफ्टी-फिफ्टी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला परंतु त्यात काहीही तथ्य नसल्याचे सांगून, महाजन यांनी सध्या ही बाब प्राथमिक चर्चेतच सुरू असल्याचे सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा ही आगामी विधानसभा निवडणुकीची संबंधित असल्याने तसेच पाच वर्ष पूर्ण झाल्याने संवाद यात्रा असून महाजनादेश समारोप यात्रेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती लागणार असल्याने नाशिक मधूनच आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फुटणार असल्याची माहिती महाजन यांनी दिली. भाजप-सेनेत राणे-भुजबळ यांना घेण्याबाबत काहीही ठरलेले नसल्याचे स्पष्ट करून नारायण राणे मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या संपर्कात आहेत. असेही त्यांनी सांगितले.