नारळ फोडण्याचे मशीन बंद; प्रवेशद्वारावरच भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 07:31 PM2020-12-18T19:31:45+5:302020-12-19T01:02:08+5:30
सप्तश्रृंगगड : उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तश्रृंगगडावर गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून नारळ फोडण्याचे मशीन बंद असल्याने पहिल्या पायरीजवळील प्रवेशद्वाराजवळच नारळ फोडण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंचा फज्जा उडत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. नारळाच्या शेड्यांचा कचराही मोठ्या प्रमाणात जमा होत आहे.
भगवती मंदिरात जाताना मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. मास्क असेल तरच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. नो मास्क, नो एंट्री तसेच फिजिकल डिस्टन्सिंचे पालन करत पायऱ्यांवर चिन्हांकित चौकोनांची आखणी केलेली आहे. त्या ठिकाणीच उभे राहून भक्त हळूहळू मंदिराकडे रवाना होत आहे. मंदिर खुले करण्यात आल्यानंतर मशीनवरच नारळ फोडले जात होते. तेव्हा प्रवेशद्वाराजवळ कुठल्याही प्रकारची गर्दी भाविकांकडून केली जात नव्हती; परंतु नारळ फोडण्याचे मशीन बंद असल्याने नाइलाजाने भाविकांना प्रवेशद्वाराजवळच नारळ फोडावे लागत आहे.
ट्रस्टचे नियोजन कोलमडले
एकाच ठिकाणी भाविक गर्दी करत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे ट्रस्टचे नियोजन कोलमडल्याचे चित्र आहे. नारळ फोडण्याचे मशीन सुरू करावे अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे. त्यामुळे प्रवेशद्वाराजवळील गर्दी कमी होईल. एकीकडे ट्रस्टतर्फे भाविकांना लांब लांब उभे राहा, फिजिकल डिस्टन्सिंचे पालन करा अशा वारंवार सूचना दिल्या जात आहे, तर दुसरीकडे प्रवेशद्वाराजवळ भाविकांची गर्दी होत आहे.