आचारसंहितेची ‘ऐसी की तैसी’
By Admin | Published: October 9, 2014 10:42 PM2014-10-09T22:42:45+5:302014-10-09T22:43:25+5:30
आचारसंहितेची ‘ऐसी की तैसी’
मालेगाव : येथील मालेगाव मध्य मतदारसंघात काही प्रमुख पक्षांकडून आचारसंहितेची ‘ऐसी की तैसी’ केली जात आहे. या पक्षाच्या उत्साहापेक्षा टवाळखोर कार्यकर्त्यांकडून केल्या जाणाया प्रचारामुळे सर्वसामान्य जनतेला सध्या त्रास भोगावा लागत आहे. त्याचा विपरीत परिणाम संबंधित उमेदवारांना येत्या निवडणुकीत दिसून येईल, अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्याचबरोबर या प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेविषयीही देखील जनतेत नाराजी आहे.मालेगाव मध्य हा जवळपास ९० टक्क्यांहून अधिक मुस्लीम मतदारसंख्या असलेला मतदारसंघ आहे. रात्रभर सुरू राहणाऱ्या यंत्रमागामुळे २४ तास जागे राहणारे शहर असा या शहराचा लौकिक आहे. अशा या शहरात प्रचारही रात्रभर करण्याचे धोरण काही पक्षांनी राबविले आहे. रात्री दहानंतर प्रचारसभा, रिक्षा वा ध्वनिक्षेपकांद्वारे प्रचार बंद करण्यात यावा या निवडणूक आयोग व आचारसंहितेच्या साध्या परंतु अत्यावश्यक नियमांना येथे खुलेआम हरताळ फासली जात आहे.