आचारसंहितेचा अडसर नाही

By admin | Published: January 5, 2017 01:45 AM2017-01-05T01:45:23+5:302017-01-05T01:45:37+5:30

प्रशासनाची ग्वाही : अकरा घरकुले बांधण्याचा मार्ग मोकळा

The Code of Conduct is not a problem | आचारसंहितेचा अडसर नाही

आचारसंहितेचा अडसर नाही

Next

 नाशिक : पंतप्रधान घरकुल आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात बांधावयाच्या सुमारे ११ हजार घरकुलांचा मार्ग मोकळा झाला असून, या घरकुले उभारणीस आचारसंहितेचा अडसर नसल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. या घरकुलांच्या पात्र लाभार्थींची निवड केली असून, लवकरच या घरकुलांना प्रशासकीय मान्यता देण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.
आचारसंहिता तोंडावर येऊन ठेपल्याने जिल्हा परिषदेच्या प्रशासनाची विकासकामे मंजूर करून त्यांना कार्यारंभ आदेश देण्याची धावपळ सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी असलेल्या पंतप्रधान घरकुल आवास योजनेंतर्गत जिल्ह्णात सुमारे ११ हजार घरकुलांचे बांधकाम करावयाचे आहे. त्यासाठी सुरुवातीला लाभार्थीच सापडत नसल्याचे चित्र होते. या अकरा हजार घरकुल लाभार्थींमध्ये सर्वाधिक पात्र लाभार्थी अनुसूचित जमाती संवर्गातील असल्याचे समजते. आता लवकरच आचारसंहिता लागू होणार असल्याने या पंतप्रधान घरकुल आवास योजनेतून घरकुलांचे प्रत्यक्ष बांधकाम करणे अडचणीचे ठरू शकते. याची कल्पना प्रशासनाला आल्याने प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून युद्धपातळीवर पंतप्रधान घरकुल आवास योजनेतील लाभार्थींची निवड अंतिम करीत त्यास मान्यता दिली. त्यानंतर या घरकुलांच्या प्रस्तावांना तत्काळ प्रशासकीय मान्यता देऊन या कामांचे प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश लवकरात लवकर काढावेत, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला दिले आहे. आचारसंहिता लागू झाली तरी या घरकुल बांधकामांना कोणतीही अडचण येणार नसल्याचा निर्वाळा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला.(प्रतिनिधी)

Web Title: The Code of Conduct is not a problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.