आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 01:13 AM2019-03-20T01:13:30+5:302019-03-20T01:14:27+5:30
येवला तालुक्यातील मुरमी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी येवला तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : येवला तालुक्यातील मुरमी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी येवला तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवानगी मंडप टाकल्याबद्दल या गुन्ह्याची नोंद झालेली असून, त्यामुळे निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर आठ दिवसांत जिल्ह्यात आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा दाखल झालेला आहे.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय येवला येथील आवारात कोणत्याही सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगी शिवाय मंडप टाकून उपोषण सुरू करून मुरमीच्या ग्रामस्थांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केलेला आहे. त्यानुसार, आनंदा बाबूराव पानसरे, गणेश बबन बगाटे, रावसाहेब केशव शिंदे, बाळू शिवराम जोंधळे, आनंदा त्र्यंबक सोनवणे, सुनीता रामदास जोंधळे, बाबासाहेब अशोक शिंदे, राजाराम शंभू पानसरे, बबन निवृत्ती शेळके (सर्व राहणार मुरमी, ता. येवला) यांच्याविरुद्ध येवला शहर पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक मनमाड रागसुधा आर., येवला शहर पोलीस निरीक्षक एन.आर. नागदरे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस नाईक शिंदे करीत आहेत.