मनपा कर्मचाऱ्याविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार
By admin | Published: February 17, 2017 12:18 AM2017-02-17T00:18:05+5:302017-02-17T00:18:16+5:30
कारवाईसाठी आयुक्तांकडे पाठविला अहवाल
नाशिक : महापालिकेच्या नगरसचिव विभागात कार्यरत असलेल्या योगेश कमोद या कर्मचाऱ्याविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल झाली असून, आचारसंहिता कक्षाने सदर तक्रार पुढील कार्यवाहीसाठी आयुक्तांकडे पाठविली आहे.
महापालिका सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होता नाही. प्रचारात सहभाग अथवा उमेदवारी करायची असल्यास अगोदर सेवेचा राजीनामा द्यावा लागतो. दरम्यान, महापालिकेच्या नगरसचिव विभागात कार्यरत असलेले योगेश कमोद हे निवडणुकीत स्वत:च्या चॅनलसाठी मुलाखती घेत असून त्यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार बहुजन भूमिहीन किसान कामगार संघर्ष समितीने आचारसंहिता कक्षाकडे केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे, योगेश कमोद यांची नाशिकरोड विभागात जन्म-मृत्यू विभागात काही महिन्यांपूर्वी बदली झाली होती. परंतु चार महिन्यांपूर्वीच त्यांची बदली रद्द होऊन ते नगरसचिव विभागात कार्यरत आहेत. त्यांनी दीड महिन्याची रजा घेतली असून, सध्या ते त्यांच्या खासगी चॅनलसाठी निवडणुकीतील उमेदवारांच्या मुलाखती घेत असल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सदर तक्रार ही आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याची माहिती आचारसंहिता कक्षप्रमुख सरिता नरके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.