नोट प्रेसला बजावणार जप्ती वॉरंट

By admin | Published: March 3, 2017 01:36 AM2017-03-03T01:36:46+5:302017-03-03T01:37:02+5:30

नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालय आणि चलार्थ पत्र मुद्रणालय यांच्याकडे असलेल्या सुमारे सहा कोटी रुपये मिळकतकराच्या थकबाकीसाठी जप्ती वॉरंट बजावण्यात येणार आहे.

Coincidence warrant issued by Press Release | नोट प्रेसला बजावणार जप्ती वॉरंट

नोट प्रेसला बजावणार जप्ती वॉरंट

Next

 नाशिक : महापालिकांना घरपट्टी व पाणीपट्टीची १०० टक्के थकबाकी वसुली करण्यासाठी राज्य सरकारने आयुक्तांना आदेश दिल्यानंतर मनपाच्या विशेष पथकांमार्फत वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालय आणि चलार्थ पत्र मुद्रणालय यांच्याकडे असलेल्या सुमारे सहा कोटी रुपये मिळकतकराच्या थकबाकीसाठी जप्ती वॉरंट बजावण्यात येणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली आहे.
राज्य सरकारने राज्यातील सर्व महापालिकांना घरपट्टी व पाणीपट्टीची शंभर टक्के वसुली करण्याचे आदेश दिले असून, त्यासाठी त्या-त्या महापालिकांच्या आयुक्तांवर जबाबदारी निश्चित केली आहे. त्यानुसार, महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी सहा विभागमिळून १८ पथके कार्यान्वित केली आहेत. त्यात पहिल्या दिवशी थकबाकीदारांकडून ३३ लाख १३ हजार रुपयांची वसुली करण्यात आली, तर पंचवटीत हॉटेल बनारसी, हॉटेल रॉयल रेसिडेन्सी यांसह प्रकाश सोनवणे, सातपूर विभागात प्रदीप जाधव, सिडको विभागात रवींद्र चौरे आणि भारत साळवे यांच्या मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, नाशिकरोडस्थित भारत प्रतिभूती मुद्रणालय आणि चलार्थ पत्र मुद्रणालय यांच्याकडे गेल्या काही वर्षांपासून मिळकत कराची थकबाकी आहे. भारत प्रतिभूती मुद्रणालयाकडे ५५ लाख ६८ हजार ९३ रुपये तर चलार्थ पत्र मुद्रणालयाकडे ५ कोटी ४३ लाख ९७ हजार ६१२ रुपयांची थकबाकी आहे.
केंद्र सरकारच्या या आस्थापनांचे आता महामंडळात रूपांतर झाल्याने त्यांना व्यावसायिक दराने घरपट्टी आकारण्यात आली आहे, परंतु दोन्ही प्रेसने त्यास नकार देत राज्य सरकारकडे अपील केले होते. परंतु, राज्य सरकारनेही त्यांचे अपील फेटाळून लावल्यानंतर आता महापालिकेने दोन्ही प्रेसला पत्र पाठवून थकबाकी भरण्याचे कळविले असून, जप्ती वॉरंटही बजावण्यात येणार असल्याचे उपआयुक्त दोरकुळकर यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Coincidence warrant issued by Press Release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.