कुलाबा वेधशाळा : ‘ओखी’अति तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात; तीव्रता होणार कमी; मध्यरात्री धडकणार सुरतेत
By azhar.sheikh | Published: December 5, 2017 09:10 PM2017-12-05T21:10:58+5:302017-12-05T21:52:43+5:30
मुंबई, नाशिकचे सरासरीपेक्षा कमाल तपमानात १० अंशाने घट झाली तर किमान तपमानात वाढ झाली. वादळ अती तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात पोहचल्याने तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असून पुढील काही तासांमध्ये ती अजून कमी होणार असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेने ‘लोकमत’ला दिली.
नाशिक : दक्षिण किनारपट्टीवरून सुरू झालेल्या ‘ओखी’ चक्रीवादळाचा तडाखा कमी होत जाणार आहे. कारण हे वादळ अति तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात पोहचले आहे. मध्यरात्री चक्रीवादळ सुरतजवळ धडकणार असून पुढे वादळाची तीव्रता कमी होत जाणार असल्याचे कुलाबा वेधशाळेच्या सुत्रांनी सांगितले.
मागील चार ते पाच दिवसांपासून ओखी या चक्रीवादळाने भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर थैमान घालत गुजरातकडे मोर्चा वळविला. या वादळाने दक्षिण भारतातील केरळ, तमिळनाडूसह आदि राज्यांना मोठा तडाखा दिला. ‘ओखी’च्या वाढत्या तीव्रतेमुळे सोमवारपासून मुंबईत संध्याकाळी पावसाला सुरूवात झाली. मंगळवारी पहाटेपासून उत्तर कोकणासह पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगाव, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी तुरळक, मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. वा-याचा वेगही सरासरीपेक्षा वाढल्याचे निरिक्षण हवामान खात्याकडून नोंदविले गेले. मुंबई, नाशिकचे सरासरीपेक्षा कमाल तपमानात १० अंशाने घट झाली तर किमान तपमानात वाढ झाली. वादळ अती तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात पोहचल्याने तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असून पुढील काही तासांमध्ये ती अजून कमी होणार असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेने ‘लोकमत’ला दिली.
--
‘ओखी’ एक दृष्टिक्षेपात...
बांग्लादेशाने या चक्रीवादळाला ‘ओखी’ हे नाव दिले. बंगाली भाषेत या शब्दाचा अर्थ डोळा होतो. हिंदी महासागर अर्थात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वादळांना ‘उष्णकटिबंधीय वादळं’ असे म्हणतात. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन झालेल्या भौगोलिक स्थितीचे चक्रीवादळात रुपांतर झाले. भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांग्लादेश, म्यानमार, मालदीवसह आठ देशांनी नावे ठरविली आहेत. भारताकडून चक्रीवादळाचा धोका ज्या-ज्या देशांना असतो ते सर्व देश एकत्र येऊन नावे सुुचवितात. यापुर्वी ‘ओखी’ वादळाचं नाव ‘मोरा’ असे होते ते थायलॅँडने दिले. ‘ओखी’चे पुढील नाव ‘सागर’ असेल व ते भारताकडून दिले जाईल.
--
शेतक-यांसाठी दिलासा; खबरदारी गरजेची
ओखी वादळामुळे निर्माण झालेल्या ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणारी नाही; मात्र नाशिक जिल्ह्यात पुढील काही तासांत सोसाट्याचा वारा किंवा गारपिटीची शक्यता अजिबात नसल्याचा, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने मंगळवारी वर्तविला. शेतक-यांनी योग्य ती खबरदारी अवश्य घ्यावी; मात्र धास्ती घेऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.