थंड अन् हरित नाशिकचा पारा पोहचला ४१ अंशपार; एप्रिल ठरला तापदायक
By अझहर शेख | Published: April 28, 2024 09:38 PM2024-04-28T21:38:53+5:302024-04-28T21:39:29+5:30
सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरातील रस्त्यांवर अघोषित संचारबंदी बघावयास मिळाली. रविवारी २४.९अंश सेल्सिअसइतके किमान तापमान सकाळी साडेआठ वाजता मोजले गेले.
नाशिक : गेल्या दोन वर्षांमध्ये यंदाचा एप्रिल महिना नाशिककरांसाठी तापदायक ठरला आहे. एप्रिलअखेर दोनदा उष्णतेच्या लाटेचा सामना नाशिककरांना करावा लागला. हंगामातील सर्वाधिक उच्चांकी ४१.२ अंश सेल्सिअसइतके कमाल तापमान रविवारी (दि.२८) शहरात सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पेठरोडवरील हवामान केंद्रात नोंदविले गेले. यामुळे नाशिककरांना दिवसभर प्रखर उन्हाचा चटका जाणवल्याने झळा असह्य झाल्या होत्या. सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरातील रस्त्यांवर अघोषित संचारबंदी बघावयास मिळाली. रविवारी २४.९अंश सेल्सिअसइतके किमान तापमान सकाळी साडेआठ वाजता मोजले गेले.
पंधरवड्यापूर्वी मंगळवारी (दि.१६) सायंकाळी नाशिक शहरात कमाल तापमानाचा पारा थेट ४०.७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. यापेक्षा जास्त कमाल तापमान आतापर्यंत नोंदविले गेले नव्हते. त्यावेळी सलग चार दिवस कमाल तापमान हे ४० पार स्थिरावत होते. रविवारी कमाल तापमान ४१ अंशाच्याही पुढे सरकले. यामुळे नागरिक घामाघूम झाले होते. घरातसुद्धा नागरिकांना उष्मा जाणवत होता. किमान तापमानदेखील २४ अंशापुढे सरकल्यामुळे नाशिककरांना रात्रदेखील ‘हॉट’ झाली आहे. यंदा एप्रिलअखेर दुसऱ्यांदा उष्णतेच्या लाटेचा सामना नाशिककर करत आहेत. शहरातील मध्यवर्ती बाजारपेठाही रविवारी ओस पडल्याचे चित्र होते.
रात्रीसुद्धा नाशिककरांना फुटतोय घाम
कमाल तापमानासोबत किमान तापमानामध्येही वाढ झाली आहे. यामुळे नाशिककरांना रात्रीसुद्धा घरात घाम फुटत आहे. दोन्ही प्रकारच्या तापमानाचा आलेख चढता राहिल्याने नागरिकांना यंदा उन्हाच्या झळा असह्य हाेऊ लागल्या आहेत.
‘ते’ चार दिवस होते चाळिशीचे...
१५ ते १८ एप्रिल हे चार दिवस नाशिककरांसाठी उष्णतेच्या लाटेचे होते. ४०.४ ते ४०.७च्या दरम्यान कमाल तापमान या चार दिवसांत नोंदविले गेले होते. तसेच किमान तापमान २२ ते २४.५ अंशापर्यंत स्थिरावले होते. हे चार दिवस नाशिककरांसाठी चांगलेच तापदायक ठरले होते. आता पुन्हा उष्णतेच्या लाटेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.