शहरात थंडी पुन्हा परतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 12:30 AM2020-12-21T00:30:50+5:302020-12-21T00:31:49+5:30

शहर व परिसरात रविवारी (दि.२०) संध्याकाळी अचानकपणे थंड वारे वेगाने वाहू लागल्याने वातावरणात गारठा वाढल्याचा अनुभव नाशिककरांना आला.

The cold returned to the city | शहरात थंडी पुन्हा परतली

शहरात थंडी पुन्हा परतली

Next
ठळक मुद्देथंड वारे वाहू लागले : किमान तापमानाचा पारा १२.२अंशावर

नाशिक : शहर व परिसरात रविवारी (दि.२०) संध्याकाळी अचानकपणे थंड वारे वेगाने वाहू लागल्याने वातावरणात गारठा वाढल्याचा अनुभव नाशिककरांना आला. ढगाळ हवामान अन‌् हलक्या सरींचा वर्षाव अशा विचित्र वातावरणाचा नाशिककर आठवडाभरापूर्वी अनुभव घेत होते. मागील चार दिवसांपासून आकाश निरभ्र झाले असून लख्ख सूर्यप्रकाश पडत आहे. रविवारी कमाल तापमान २७.४ अंश तर किमान तापमान १२.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.

शहराचे वातावरण थंड होऊ लागले असून किमान तापमानाचा पारा या आठवड्यात वेगाने घसरण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तविली जात आहे. उत्तरेकडील शीतलहरी राज्याच्या वेशीवर आल्याने शहराच्या वातावरणात अचानकपणे गारठा वाढू शकतो, असे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. ढगाळस्थिती दूर झाल्यामुळे सध्या कोरडे वातावरण अनुभवयास येत आहे. अरबी समुद्रात मागील आठवड्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणातून थंडी गायब झाली होती. राज्यातील विविध शहरांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत किमान तापमानाचा पारा झपाट्याने खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विदर्भाला पुन्हा हुडहुडी भरु लागली असून रविवारी गोंदिया येथे राज्यातील सर्वाधिक नीचांकी ७.४अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदविले गेले. त्याखालोखाल नागपूर, वर्धामध्ये पारा घसरला आहे. एकूणच विदर्भ गारठत असताना रविवारी संध्याकाळपासून उत्तर महाराष्ट्रातही थंड वाऱ्यांचा वेग वाढल्याचे दिसून आले. नाशिक, जळगावचे तापमानही घसरले आहे. महाबळेश्वर अन‌् नाशिक शहराचे किमान तापमान जवळपास सारखे आहे.

--इन्फो--

तीन अंशांनी घसरण होण्याची शक्यता

हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत पुन्हा तीन अंशांनी किमान तापमानात घसरण होऊ शकते. त्यानंतर पुन्हा राज्याचा किमान तापमानाचा पारा काही दिवसांसाठी चढता असेल. सध्या बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीय वारे सक्रिय असल्याची स्थिती आहे, त्याचा परिणाम काही दिवसांत दिसून येऊ शकेल.

---इन्फो--

उबदार कपडे खरेदीचा ‘सण्डे’ मुहूर्त

रविवारची सुटी अन‌् सुटलेले थंड वारे यामुळे नाशिककरांनी सहकुटुंब उबदार कपड्यांच्या खरेदीचा ‘मुहूर्त’ साधल्याचे चित्र बाजारपेठेत पाहावयास मिळाले. रविवारी दिवसभर शरणपूररोडवरील तिबेटियन बाजार, मेनरोड, शालिमार या भागातील दुकानांमध्ये उबदार कपडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.

Web Title: The cold returned to the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.