नाशकात थंडीचा कडाका कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 01:39 AM2018-12-13T01:39:08+5:302018-12-13T01:40:29+5:30
हिवाळ्याच्या या हंगामात सर्वाधिक नीचांकी तापमान मंगळवारी (दि. ११) ९.४ अंश इतके नोंदविले गेले. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता शहरातील हवामान निरीक्षण केंद्राकडून ९.६ इतके किमान तापमान मोजण्यात आले. शहरात मागील दोन ते तीन दिवसांपासून थंडीचा कडाका कायम असून, नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.
नाशिक : हिवाळ्याच्या या हंगामात सर्वाधिक नीचांकी तापमान मंगळवारी (दि. ११) ९.४ अंश इतके नोंदविले गेले.
बुधवारी सकाळी साडेआठ वाजता शहरातील हवामान निरीक्षण केंद्राकडून ९.६ इतके किमान तापमान मोजण्यात आले. शहरात मागील दोन ते तीन दिवसांपासून थंडीचा कडाका कायम असून, नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.
जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सर्वाधिक कमी ८.८ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.
जिल्ह्यातील थंडीच्या वाढत्या कडाक्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे मत डॉक्टरांनी व्यक्त
केले आहे. राज्यात सोमवारी (दि. १०) सर्वाधिक कमी तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली होती. शहरात किमान तापमान १२.८ तर कमाल तापमानाचा पारा थेट २८.२ अंशापर्यंत खाली घसरला होता. त्यामुळे सध्या राज्यात नाशिक महाबळेश्वरपेक्षाही अधिक थंड शहर बनले आहे. मागील काही दिवसांपासून किमान तापमानाचा पारा कमी-जास्त होत असल्याचे थंडीच्या तीव्रतेतही फरक पडत होता; मात्र अचानकपणे या आठवड्यात हवामानात कमालीचा बदल झाला. मंगळवारपासून किमान तापमानाचा पारा त्यापेक्षाही अधिक खाली घसरू लागल्याने थंडीने शहर गारठले आहे. मंगळवारी ९.४, बुधवारी ९.६ इतके किमान तापमान नोंदविले गेले. एकूणच थंडीचा कडाका वाढताच नाशिककरांनी उबदार कपड्यांच्या वापरावर भर देण्यास सुरुवात केली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक चहा, कॉफीला पसंती देत आहेत. संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर हवेत गारठा जाणवण्यास सुरुवात होते तर सकाळी अकरा वाजेपर्यंत वातावरणात थंडी जाणवत असल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे. किमान तापमानाचा पारा कमी झाल्यामुळे कमाल तापमानदेखील तिशीच्या खाली सरकले आहे. या हंगामात ९.२ ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली आहे.
गतवर्षापेक्षा यंदा जोर अधिक
गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी थंडीचा जोर अधिक असल्याचे हवामान खात्याकडील नोंदींवरून स्पष्ट होते. यंदा पर्जन्यमानाचे प्रमाण कमी राहिले असले तरी थंडीचा कडाका मात्र अधिक असल्याचे जाणवत आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये ९, १०, ११, १२ या तारखांना अनुक्रमे किमान तापमान १५.२, १५.४, १४.००, १३.२ अंश इतके नोंदविले गेले होते. मागील वर्षी २९ डिसेंबर रोजी सर्वाधिक नीचांकी ७.६ अंशापर्यंत किमान तापमानाची नोंद झाली होती. यावर्षी या तारखांना अनुक्रमे ११.३, १२.८, ९.४, ९.६ इतके किमान तापमान नोंदविले गेले आहे.