गोदाकाठी पुन्हा थंडीचा कडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:10 AM2020-01-10T00:10:53+5:302020-01-10T00:11:36+5:30
गोदाकाठ भागात तापमानाचा पारा आणखी घसरला असून, गुरुवारी (दि. ९) कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात ८.८ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने अवघा निफाड तालुका कडाक्याच्या थंडीने गारठून गेला होता. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली असून, गेल्या दोन - तीन दिवसांपासून थंडीने आपला रुद्रावतार वाढवत नेल्याने गुरुवारी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात ८.८ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली.
निफाड : गोदाकाठ भागात तापमानाचा पारा आणखी घसरला असून, गुरुवारी (दि. ९) कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात ८.८ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने अवघा निफाड तालुका कडाक्याच्या थंडीने गारठून गेला होता.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली असून, गेल्या दोन - तीन दिवसांपासून थंडीने आपला रुद्रावतार वाढवत नेल्याने गुरुवारी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात ८.८ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे कडाक्याच्या थंडीने निफाडकरांना गारठून टाकले होते. नाशिककरांना पुन्हा आठवडाभराने थंडीचा कडाका सहन करावा लागला. किमान तापमानाचा पारा थेट १०.२ अंशांपर्यंत घसरल्याची नोंद झाली. या हंगामातील ही नीचांकी नोंद ठरली. मागील बुधवारी १०.३ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले होते. या हंगामात पुन्हा तिसऱ्यांदा राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमान नाशिकमध्ये नोंदविले गेले. ढगाळ हवामानामुळे काही दिवस गायब झालेल्या थंडीने पुन्हा एकदा जोर धरला असून. निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागात गुरुवारी ११.५ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. वाढत्या थंडीने शेतकरी धास्तावले असून, पिकांच्या वाढीवर परिणाम जाणवू लागले आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक थंडी निफाड तालुक्यात असते. मागील वर्षी राज्यातील सर्वाधिक कमी म्हणजेच ० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. यंदा मात्र काही दिवसांपूर्वी थंडीने जोर धरला होता. १० अंशावर आलेले तापमान २० अंशावर जाऊन पोहचले होते.
नाशिक शहराचा किमान तापमानाचा पारा घसरत असून, नागरिकांना मागील दोन आठवड्यांपासून थंडीच्या तीव्रतेचा सामना करावा लागत आहे. नव्या वर्षाचा मागील आठवड्यातही शहर गारठलेले होते. या आठवड्याच्या मध्यावर पुन्हा थंडीची लाट शहरात आल्याने नागरिकांकडे उबदार कपड्यांचा वापर करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. बुधवारी संध्याकाळनंतर वातावरणात गारवा निर्माण झाला होता. सकाळी ८ वाजता हवामान निरीक्षण केंद्राकडून पारा मोजण्यात आला असता १०.२ अंशांपर्यंत तापमानापर्यंत खाली आल्याचे दिसून आले. दिवसभर लख्ख सूर्यप्रकाश असतानाही गारठा जाणवत होता.
द्राक्ष मण्यांच्या फुगवणीवर परिणाम
गोदाकाठ परिसरात ऊसतोडीसाठी आलेल्या ऊसतोड कामगारांनी, शेतकऱ्यांनी, नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवून ऊब मिळवण्याचा प्रयत्न केला. कडाक्याच्या थंडीमुळे तालुक्यात दिवसभर गारवा जाणवत होता. ही थंडी गहू, कांदे पिकांना फायदेशीर ठरणार आहे. मात्र या वाढत जाणाºया कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षमण्यांना तडे पडणे, फुगवण कमी होणे, वेलींना अन्न पुरवठा कमी होणे आदी परिणाम दिसू लागल्याने द्राक्ष बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे. वाढत्या थंडीमुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू असून, तेथील धबधबेदेखील गोठले असून, किमान तापमान उणे झाले आहे. यामुळे उत्तर भारतासह उत्तर महाराष्टÑ, विदर्भ, मराठवाड्याच्या वातावरणावरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. राज्यात नीचांकी तापमानाची नोंद बुधवारी नाशिकमध्ये झाली. महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी पारा १३ अंशांपर्यंत मोजला गेला. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.