शहरात थंडीचा जोर कायम
By admin | Published: December 24, 2014 12:10 AM2014-12-24T00:10:06+5:302014-12-24T00:21:14+5:30
तपमान ७़१ अंशावर; नाशिककर गारठले
नाशिक : गेल्या आठवडाभरापासून वातावरणाचा पारा दिवसेंदिवस घसरत असल्याने नाशिककरांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. आजचे तपमान ७़ १ अंशावर होते़ कालच्या तुलनेत पारा चार अंशांनी घसरल्याने थंडीचा जोर कायम आहे़ यामुळे रात्रीसह दिवसभरही नाशिककर उबदार कपडे परिधान करून वावरताना दिसत आहेत़
आठ दिवसांपूर्वी यंदाच्या मोसमातील सर्वांत नीचांकी तपमानाची (६.३ अंश सेल्सिअस) नोंद करण्यात आली होती. याच्या परिणामी शहरात पाच जणांचा बळी गेल्याची घटना घडली होती़ यानंतर तीन दिवसांत पुन्हा तपमानात वाढ झाली होती़ शनिवारी (दि़ २०) तपमान साडेदहा अंशांवर आल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला होता; परंतु दुसऱ्या दिवसापासून पुन्हा तपमानाचा पारा घसरू लागला असून, आज तपमानाचा किमान पारा ७.१ अंशावर स्थिरावला आहे. रात्रीसह दिवसभरही थंड वारे वाहत असल्याने हवेत गारवा कायम आहे़ यामुळे नाशिककरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. थंडीचा जोर बघता सायंकाळी पाच वाजेनंतर शहरातील रस्त्यांवरची वर्दळ कमी होत आहे, तर दिवसभर उबदार कपडे परिधान करून नागरिक वावरताना बघावयास मिळत आहेत. पुढचे दोन ते तीन दिवस वातावरणात फारसा बदल होणार नसल्याने थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता मेरी वेधशाळेने व्यक्त केली आहे.