थंडीचा जोर कायम ; पारा ९.५ अंशांपर्यंत घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 01:02 AM2018-12-19T01:02:11+5:302018-12-19T01:02:36+5:30
किमान आणि कमाल तपमानात सातत्याने घसरण सुरूच आहे. मंगळवारी (दि.१८) किमान तपमानाचा पारा ९.५ अंशांपर्यंत खाली घसरला. सोमवारच्या तुलनेत केवळ एक अंशाने पारा वर सरकला असला तरी कमाल तपमान २६.७ अंश इतके नोंदविले गेले. त्यामुळे थंडीचा कडाका कायम असून, नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.
नाशिक : किमान आणि कमाल तपमानात सातत्याने घसरण सुरूच आहे. मंगळवारी (दि.१८) किमान तपमानाचा पारा ९.५ अंशांपर्यंत खाली घसरला. सोमवारच्या तुलनेत केवळ एक अंशाने पारा वर सरकला असला तरी कमाल तपमान २६.७ अंश इतके नोंदविले गेले. त्यामुळे थंडीचा कडाका कायम असून, नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.
मागील वर्षी डिसेंबरअखेर ७.५ अंश इतकी नीचांकी नोंद झाली होती. यावर्षी सोमवारी ८.५ अंश इतकी नोंद झाली. आठवडाभरापासून नाशिककर वाढत्या थंडीने गारठले असून, तपमानाचा पारा सातत्याने दहा अंशांच्या जवळपास स्थिरावत होता; मात्र सोमवारी पारा थेट आठ अंशांपर्यंत खाली आल्याने नाशिककर चांगलेच गारठले. पहाटेपासून दुपारपर्यंत नाशिककरांना हुडहुडी जाणवत होती. संध्याकाळी पाच वाजेनंतर पुन्हा गारवा वाढण्यास सुरुवात होत आहे. मागील सहा दिवसांपासून शहराचे किमान तपमान दहा अंशांच्या आसपास स्थिरावत आहे. कमाल तपमानात मागील पाच दिवसांपासून घसरण सुरूच आहे. उत्तर भारतात थंडीने कहर केल्याने उत्तर महाराष्टतील वातावरणावरही त्याचा प्रभाव जाणवत आहे.
तीन दिवसांपासून गारठा
मागील तीन दिवसांपासून पारा अधिक घसरू लागला आहे. थंडीपासून दिलासा मिळण्यासाठी नाशिककरांना पुढील दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात जळगावनंतर मंगळवारी नाशिक हे सर्वाधिक थंडीने गारठलेले शहर होते. जळगावमध्ये ९ अंश तर नाशकात ९.५ अंश इतके तपमान नोंदविले गेले.