थंडीमुळे गहू, हरभरा बहरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 02:27 PM2019-02-05T14:27:36+5:302019-02-05T14:28:35+5:30
रामनगर : वाढलेल्या थंडीने गहू ,हरभरा पिकांना मोठा फायदा झाला असल्याचे चित्र निफाड तालुक्यातील ग्रामीण भागात दिसत आहे.
रामनगर : निफाड तालुक्यातील यंदाच्या वर्षीच्या थंडीने सर्व विक्रम मोडीत काढत निचांकी तपमानाची नोंद केली. कडाक्याच्या थंडीने संपुर्ण निफाड तालुक्यातील गावाना हुडहुडी भरवली. तपमानाने अगदी २-३ अंशा पर्यत पारा घसरल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले. थंडीने द्राक्ष उत्पादनावर विपरीत परीणाम होण्याची भिंती शेतक-यांना वाटत आहे. परंतु वाढलेल्या थंडीने गहू ,हरभरा पिकांना मोठा फायदा झाला असल्याचे चित्र निफाड तालुक्यातील ग्रामीण भागात दिसत आहे.
मागील महिन्यापासून निफाड तालुक्यात कडाक्याची थंडी पडली. जोरदार थंडीचा फटका द्राक्ष,डाळिंब उत्पादकांना सोसावा लागला .तरी पण रब्बी हंगामातील मुख्य पिके म्हणजे गहू,हरभरा यांना मात्र थंडीचा फायदा झाल्याचे चित्र परिसरांत दिसत आहे. रब्बी पिकांना थंडी पोषक असते. थंडीमुळे गहू,हरभरा पिके जोरदार बहरली असुन उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहे. तालुक्यात अंदाजे दहा ते अकरा हजार हेक्टरवर गहू हरभरा पेरणी झाली असून त्यापासून चांगले उत्पादन शेतकºयांच्या हाती येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यंदा सरासरीच्या तुलनेत निफाड तालुक्यात कमी पाऊस पडला . त्याचा परिणाम रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांच्या पेरणीवर झाला . दरवर्षी तेरा ते चौदा हजार हेक्टरवर होत होती .कमी पावसामुळे यंदा मात्र त्यात घट झाल्याचे चित्र पहायला मिळते.पेरणीनंतर सुरवातीच्या काळात थंडी कमी होती मात्र मागील मिहन्यापासून कडाक्याच्या थंडीने जोर धरला आहे .त्यामुळे रब्बी हंगामातील गहू हरभरा व इतर रब्बी हंगामातील पिके जोरदार बहरली आहे .