नाशकात थंडीचा कहर : अज्ञात वृध्दांचा थंडीने गारठून मृत्यूचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 07:42 PM2019-02-09T19:42:47+5:302019-02-09T19:46:17+5:30
तपोवन परिसरात दवबिंदू पहाटे गोठले गेले. या भागातील गवतांवर हिमकण पहावयास मिळाल्याचे रहिवाशांनी सांगितले. येथे सकाळी किमान तापमान २.२ अंश इतके नोंदविले गेले. निफाडमध्ये पारा ३अंशापर्यंत खाली घसरल्याची नोंद झाली
नाशिक : थंडीचा कहर नाशिक शहरासह जिल्ह्यात सुरूच असून शनिवारी (दि.९) किमान तापमानाचा पारा थेट ४ अंशापर्यंत घसरला. त्यामुळे राज्यात सर्वाधिक थंडीचा कडाका नाशिक शहरात नोंदविला गेला. हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली. थंडीच्या कडाक्याने नाशिककर पुन्हा गारठले असून डिसेंबरमध्ये ५.३ अंशापर्यंत झालेल्या नीचांकी नोंद मोडित निघाली आहे. गोदाघाटावर उघड्यावर राहणाऱ्या दोन अज्ञात वृध्दांचा थंडीने गारठून मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
उत्तर भारतात होणा-या बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑसह विदर्भ गारठला आहे. हिमालय व काश्मिरमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत असल्याने शीतलहर कायम आहे. परिणामी उत्तर महाराष्टÑात वातावरण अधिकाधिक थंड झाले आहे. हवामान खात्याकडून प्राप्त सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरासह संपुर्ण जिल्ह्यात थंडीची लाट रविवारी (दि.१०) मध्यरात्रीपर्यंत कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून मागील आठवडाभरापासून शहरात गारठा कायम आहे. १७ अंशापर्यंत वर सरकलेले किमान तापमान या चार ते पाच दिवसांत थेट ४ अंशावर घसरले. तर कमाल तापमान ३२ अंशावरून २४ अंशापर्यंत खाली आले आहे. त्यामुळे नाशिककर कमालीचे गारठले आहे. बुधवारी रात्रीपासून शहरात थंड वारे वेगाने वाहू लागल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. गुरूवारी वाºयाचा वेग अधिकच वाढला होता. संध्याकाळपर्यंत ताशी १३ कि.मी वेगाने वारे वाहिल्याची नोंद झाली होती. त्यामुळे शुक्रवारी किमान तापमान १३.२ अंशावरून थेट ९ अंशावर घसरले. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपाासून वाºयाचा वेग जरी कमी झाला असला तरी पहाटेपासून वातावरणात निर्माण झालेला गारवा टिकून होता. संध्याकाळी सात वाजेनंतर पुन्हा थंड वाºयाचा वेग वाढल्याने शनिवारी सकाळी पारा ४ अंशापर्यंत घसरला. यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली असून कोमट पाणी पिण्यास नागरिकांकडून पसंती दिली जात आहे.
तपोवनात दवबिंदू गोठले
तपोवन परिसरात दवबिंदू पहाटे गोठले गेले. या भागातील गवतांवर हिमकण पहावयास मिळाल्याचे रहिवाशांनी सांगितले. येथे सकाळी किमान तापमान २.२ अंश इतके नोंदविले गेले. निफाडमध्ये पारा ३अंशापर्यंत खाली घसरल्याची नोंद झाली. यावर्षी थंडीचा कडाका नाशिककरांना अधिकच तीव्रतेने अनुभवयास येत आहे.