राज्यात सर्वाधिक थंडीचा कडाका नाशकात; पारा ९.८ अंशापर्यंत घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 06:37 PM2020-01-16T18:37:07+5:302020-01-16T18:40:49+5:30
मकरसंक्रातीनंतर थंडीचा जोर कमी होण्यास सुरूवात होते, असे बोलले जाते. यावर्षी मात्र थंडीचे आगमन उशिराने झाले. त्यामुळे जानेवारीच्या मध्यावर पारा दहा अंशापेक्षा खाली घसरल्याची नोंद झाली.
नाशिक : शहरासह जिल्हा अचानकपणे गुरूवारी (दि.१६) गारठला. राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमान ९.८ अंश इतके सकाळी नोंदविले गेले. तापमानाचा पारा अचानकपणे १५ अंशावरून थेट खाली घसरला. मंगळवारी (दि.१४) किमान तापमान १५ अंश इतके नोंदविले गेले होते. थंडीचा कहर शहरात वाढल्यामुळे गुरूवारी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी उबदार कपड्यांच्या वापरास प्राधान्य दिले.
नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यापासून थंडीची तीव्रता वाढली आहे; मात्र किमान तापमानाचा पारा १०.२ अंशापेक्षा खाली या हंगामात घसरला नव्हता. गुरूवारी प्रथमच पारा ९.८ अंशापर्यंत खाली घसरला. यामुळे नागरिकांना थंडीची प्रचंड तीव्रता जाणवली. पहाटेच्या सुमारास जोरदार थंडी पडल्यामुळे सकाळी फेरफटका मारणाऱ्यांची संख्याही रोडावल्याचे चित्र शहरातील जॉगींग ट्रॅक भागात दिसले. जे जॉगर्स नियमितपणे घराबाहेर पडले, ते संपुर्णता उबदार कपड्यांनी ‘पॅक अप’ करूनच. तसेच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही हातमोजे, जॅकेट, स्वेटर्स, कानटोपी परिधान करून वर्गांमध्ये हजेरी लावली.
मकरसंक्रातीनंतर थंडीचा जोर कमी होण्यास सुरूवात होते, असे बोलले जाते. यावर्षी मात्र थंडीचे आगमन उशिराने झाले. त्यामुळे जानेवारीच्या मध्यावर पारा दहा अंशापेक्षा खाली घसरल्याची नोंद झाली. मागील वर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पारा दहा अंशाच खाली आला होता. बुधवारी शहराचे किमान तापमान १३.४ अंश इतके होते. तर कमाल तापमान २५.९ अंश नोंदविले गेले होते. संक्रांतीच्या दुस-याच दिवशी किमान तापमान वेगाने खाली घसरल्याने थंडीचा कडाका वाढला. बुधवारी संध्याकाळनंतर अचानकपणे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मध्यरात्रीपासून थंड वारे वेगाने वाहू लागल्याने गुरुवारी पहाटे थंडीचा चांगलाच फटका नाशिककरांना बसला. महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी तापमान १०.८ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. थंडीची तीव्रता वाढल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले आहे. सर्दी-पडसे, खोकला, घसा खवखवणे यांसारख्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये, असेही ते म्हणाले.
शहराचे आठवडाभरातील तापमान असे...
मंगळवारी (दि.७) १४
बुधवारी (दि.८) १६
गुरूवारी (दि.९) १०.२
शुक्रवारी (दि.१०) १०.८
शनिवारी (दि.११) १२.५
रविवारी (दि.१२) १३.५
सोमवारी (दि.१३) १५.५
मंगळवारी (दि.१४) १५.०
बुधवारी (दि.१५) १३.४