कोरोना संसर्ग काळात ४१४ रक्तपिशव्यांचे संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 05:01 PM2020-08-08T17:01:42+5:302020-08-08T17:02:55+5:30
सिन्नर :रुग्णांसाठी रक्ताची गरज असल्याचा फोन जिल्हा रुग्णालयातून आला अन् 24 तासातच 93 रक्तपिशव्यांचे संकलन करून मदत पोहोचती करण्यात आली. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कार्यकर्त्यांसह नागरिकांनी एकत्रित येत कोरोना संसर्ग काळात आत्तापर्यंत एकुण 414 रक्त पिशव्यांची मदत केली आहे.
सिन्नर :रुग्णांसाठी रक्ताची गरज असल्याचा फोन जिल्हा रुग्णालयातून आला अन् 24 तासातच 93 रक्तपिशव्यांचे संकलन करून मदत पोहोचती करण्यात आली. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कार्यकर्त्यांसह नागरिकांनी एकत्रित येत कोरोना संसर्ग काळात आत्तापर्यंत एकुण 414 रक्त पिशव्यांची मदत केली आहे.
कोरोना संसर्गामुळे रक्त तुटवडा निर्माण होत असून जिल्हा रुग्णालयासह रक्तपेढ्या कडून रक्तदानासाठी सामाजिक संस्थांना मदतीचे आवाहन केले जात आहे. विविध शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना रक्ताची गरज भासत असल्याने रक्तदान शिबिरांचे आयोजनही केले जात आहे.
जिल्हा रुग्णालयात रक्ताची गरज असल्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश जगदाळे यांनी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना कळवले. त्यांनी लगेचच नगरसेवक पंकज मोरे व शिवसेना पदाधिकाऱ्यांना रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना केल्या. सिन्नरला कडकडीत लॉकडाऊन होता त्या काळात बजरंग व शिवालय मंडळाच्या सहकार्याने शहरा जवळच सरदवाडी ग्रामपंचायतीच्या सभागृहात शिबिराचे आयोजन करून कार्यकर्त्यांसह नागरिकांना रक्त दान करण्याचे आवाहन सोशल मीडियावर करण्यात आले. रक्त संकलनासाठी जिल्हा रुग्णालयातील 20 जणांचे पथकही लगेच दाखल झाले. अल्प काळातही 93 दात्यांनी रक्तदान केले. गरजेच्या वेळी रक्तपुरवठा झाल्याने जगदाळे यांनी रक्तदात्यांचे आभार मानले. माजी आमदार वाजे यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पाच शिबिरांद्वारे 414 रक्तपिशव्या यांचे संकलन
कोरोना संसर्गामुळे रक्ताचा तुटवडा असून त्यामुळे रुग्णांवरील शस्त्रक्रियाही पुढे ढकलाव्या लागत आहेत. रक्ताची वेळेत गरज पूर्ण न झाल्यास त्यांच्या जीवितासही धोका पोहोचू शकतो. अशा स्थितीत माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयातून रक्त तुटवडा असल्याची माहिती मिळताच पाच वेळा शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सोशल मीडिया वरून कार्यकर्ते व नागरिकांच्या मदतीतून आत्तापर्यंत 414 रस्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे.
चौकट-
थॅलेसेमिया रुग्णांना मिळाले जीवदान
थॅलेसेमिया रुग्णांना 15 ते 21 दिवसांनी रक्त द्यावे लागते. रक्त तुटवडा भासत असल्याने थॅलेसेमिया रुग्णांसाठी विशेष मदत म्हणून शिवसेना कार्यालयात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी 114 जणांनी रक्तदान करून थॅलॅसिमिया रुग्णांना जीवदान दिले.रक्त संकलनात सिन्नरकरांच्या होत असलेल्या मदतीबद्दल वैद्यकीय क्षेत्रातून आभार मानले जात आहे.