‘नाशिक प्लॉगर्स’कडून ४०० किलो कचऱ्याचे संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2022 01:52 AM2022-06-06T01:52:40+5:302022-06-06T01:53:09+5:30
वेळ सकाळी सात वाजेची...नेहमीप्रमाणे इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक रविवारी हाऊसफुल्ल... हिरवे टी-शर्ट घातलेले हातात काळ्या पिशव्या घेऊन तरुण, तरुणींचा मोठा समूह ‘ट्रॅक’वर अवतरला...घाईगर्दीने सर्वांनी हातमोजे चढविले अन् ट्रॅकवर स्वच्छता करण्यास सुरुवात केली. केवळ प्लॅस्टिकच नव्हे तर तंबाखू, गुटखा, फास्टफूडच्या रॅपरपासून ते विडी-सिगारेटच्या थोटक्यांपर्यंतचा सर्वप्रकारचा कचरा या तरुणाईने जमा करण्यास सुरुवात केली. हा तरुणाईचा समूह होता तो म्हणजे ‘नाशिक प्लॉगर्स’.
नाशिक : वेळ सकाळी सात वाजेची...नेहमीप्रमाणे इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक रविवारी हाऊसफुल्ल... हिरवे टी-शर्ट घातलेले हातात काळ्या पिशव्या घेऊन तरुण, तरुणींचा मोठा समूह ‘ट्रॅक’वर अवतरला...घाईगर्दीने सर्वांनी हातमोजे चढविले अन् ट्रॅकवर स्वच्छता करण्यास सुरुवात केली. केवळ प्लॅस्टिकच नव्हे तर तंबाखू, गुटखा, फास्टफूडच्या रॅपरपासून ते विडी-सिगारेटच्या थोटक्यांपर्यंतचा सर्वप्रकारचा कचरा या तरुणाईने जमा करण्यास सुरुवात केली. हा तरुणाईचा समूह होता तो म्हणजे ‘नाशिक प्लॉगर्स’.
आपले आरोग्य चांगले रहावे, यासाठी सकाळच्या ताज्या हवेत फेरफटका (मॉर्निंग वॉक) मारणाऱ्यांची संख्या तशी खूप आहे; मात्र हा फेरफटका मारताना आपले अन् आपल्या परिसराचे ‘आरोग्य’ सुधारण्यासाठी प्रयत्न करणारे खूप कमी आहेत. नाशिक प्लॉगर्स हे त्यापैकीच आहे. शंभरापेक्षा जास्त तरुण, तरुणींचा हा समूह वीकेण्डला कुठे ‘मिसळ पार्टी’ला जात नाही तर तो शहराच्या गजबजणाऱ्या भागात येऊन ‘मिशन क्लीन अप’ मोहीम राबविताना दिसतो. या तरुणाईसाठी दररोजच पर्यावरणदिन असतो. रविवारी (दि.५) जागतिक पर्यावरणदिनी यांचा उत्साह अधिकच वाढलेला दिसून आला. साईनाथनगर ते बोगद्यापर्यंत जॉगिंग ट्रॅकसह सभोवतालचा परिसर स्वच्छतेचा टास्क या प्लॉगर्स मंडळींनी दीड ते दोन तासांत संपविला. ७७ मोठ्या पिशव्या भरून सुमारे ४०० किलो कचऱ्यांचे संकलन यावेळी करण्यात आले. तरुण मुले कचरा वेचताना व वेचलेल्या कचऱ्याने भरलेल्या पिशव्या खांद्यावर टाकून ट्रॅकवरून चालत असल्याचे बघून इंदिरानगरवासीयांनाही धक्काच बसला. यावेळी त्यांच्यासोबतीला होते ते व्हिसलमॅन चंद्रकिशोर उर्फ चंदू पाटील. पाटील यांनीही कचऱ्याचे संकलन करत तरुणाईचा उत्साह अधिक वाढविला.
--इन्फो--
सिगारेटचे थोटके बाटल्यांत
सिगारेटचा धूर हवेत सोडल्यानंतर थोटके फेकून देणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. हे थोटके पर्यावरणाला अर्थातच मातीला व जमिनीला घातक ठरणारे आहेत. मातीमधील गुणधर्म सिगारेटच्या थोटक्यांमुळे नष्ट होतात व जमीन नापीक होत चालते. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, सिटी गार्डनच्या परिसरातून असे थोटके शोधून या प्लॉगर्स मंडळीने कचऱ्यात सापडलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांत जमा केले.