एचएएल कामगारांचे सामुहिक मुंडण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 03:46 PM2019-06-25T15:46:52+5:302019-06-25T15:47:24+5:30
साखळी उपोषणास प्रारंभ : वेतनकरार रखडल्याने आंदोलन
ओझरटाऊनशिप : एच. ए. एल कामगारांच्या रखडलेल्या वेतन करारासाठी अखिल भारतीय एच. ए. एल ट्रेड युनियन को- आर्डीनेशन कमिटीच्या अंतर्गत नाशिक विभाग एच.ए. एल. कामगारांनी मंगळवार (दि.२५) पासून २ जुलैपर्यंत करण्यात येणाऱ्या साखळी उपोषण आंदोलनास प्रारंभ केला. दरम्यान, व्यवस्थापनाचा निषेध म्हणून कामगारांनी सामुहिक मुंडण करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
एच. ए. एल प्रवेशद्वारावर १ जानेवारी २०१७ चा वेतन करार लवकर करण्यात यावा, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आॅल इंडिया एच. ए. एल समन्वय समितीचे प्रवक्ते व कामगार संघटनेचे अध्यक्ष बी.व्ही.शेळके आणि संघटनेचे सरचिटणीस सचिन ढोमसे यांनी सांगितले, की एच. ए. एल कामगारांच्या ३० महिन्यांपासूनच्या प्रलंबीत वेतन कराराची चर्चा व्यवस्थापनाच्या आडमुठेपणामुळे रखडली आहे. १ जानेवारी २०१७ पासूनच्या वेतन कराराचे लाभ अधिकारी वर्गाला मिळत आहेत परंतु,अस्थापनाचे आधारस्तंभ असलेल्या कामगारांची मात्र व्यवस्थापन क्रूर चेष्टा करत आहे. नि:ष्पक्ष आणि रास्त व विना विलंब वेतन करार ही संपूर्ण भारतातील एच. ए. एल संघटनांची रास्त मागणी आहे . एच ए एल वेतनमान न वाढल्याने कामगार वर्गात असंतोष पसरत असून याचाच निषेध म्हणून देशभरातील एच. ए. एलच्या सर्व प्रभागामध्ये साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तसेच आंदोलनाचा भाग म्हणून सर्व प्रभागामध्ये २४ जुन रोजी वेतन करार माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले आहे. आंदोलन तिव्र करण्यासाठी बंगळुरू मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचेही बी.व्ही. शेळके यांनी सांगितले