जिल्हाधिकारी थेट पोहोचले वसतिगृहातील किचनमध्ये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2022 01:35 AM2022-04-21T01:35:34+5:302022-04-21T01:35:56+5:30
नाशिक-पुणे रोडवरील समाजकल्याण विभागाच्या आवारात जिल्हाधिकारी पोहोचले आणि त्यांनी मुलींच्या वसतिगृहातील किचनमध्ये थेट प्रवेश केला. तेथे असलेल्या भाजीपाल्याची पाहणी करताना त्यांनी काकडी आणि कारले तोडून पाहिले आणि मुलींना कारलेच का दिले जात आहे, याबाबत विचारणाही केली. वसतिगृहातील दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त करतानाच त्यांनी दुरूस्तीसाठी अधिकाऱ्यांना आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला असल्याचे समजते.
नाशिक : नाशिक-पुणे रोडवरील समाजकल्याण विभागाच्या आवारात जिल्हाधिकारी पोहोचले आणि त्यांनी मुलींच्या वसतिगृहातील किचनमध्ये थेट प्रवेश केला. तेथे असलेल्या भाजीपाल्याची पाहणी करताना त्यांनी काकडी आणि कारले तोडून पाहिले आणि मुलींना कारलेच का दिले जात आहे, याबाबत विचारणाही केली. वसतिगृहातील दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त करतानाच त्यांनी दुरूस्तीसाठी अधिकाऱ्यांना आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला असल्याचे समजते.
मागील आठवड्यात विधिमंडळाच्या अनुसूचित जाती समितीने शासकीय विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतानाच समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांचीही पाहणी केली होती. या ठिकाणी असलेली दुरवस्था आणि मुलींना कोविडमध्ये वापरलेल्या गाद्या आणि बेडस् दिल्याची गंभीर बाब विद्यार्थिनींनी कथन केल्यानंतर समितीने समाजकल्याण अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांनी बुधवारी अचानक समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहाची पाहणी केली असता, त्यांनीही अधिकाऱ्यांना अनेक जाब विचारल्याचे कळते.
वसतिगृह तसेच परिसराची पाहणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी थेट येथील स्वयंपाकघराची पाहणी केल्याचे समजते. याठिकाणी असलेला भाजीपाला ताजा आहे किंवा नाही, याची खात्री करण्यासाठी त्यांनी काडडी व कारलेही तोडून पाहिले. कारले खाण्याची मागणी जर मुलींकडून केली जात नसेल, तर त्यांना जेवणात कारले का दिले जाते, याबाबतही त्यांनी विचारणा केल्याचे समजते. त्यांच्या या धडक मोहिमेमुळे अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.
वसतिगृहाच्या इमारतीची दुरूस्ती करण्याची आवश्यकता असल्याने आवश्यक असलेली दुरूस्ती तसेच डागडुजी करून येत्या आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी बांधकाम विभागाला दिले. समितीच्या दौऱ्यानंतर वसतिगृहातील कोविडचे पलंग आणि गाद्या हटविण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही अनेक त्रुटी आणि दुरुस्तीची गरज असल्याने त्याबाबत सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
--इन्पो--
बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दुरूस्तीच्या सूचना करताना त्यांच्याकडूनही माहिती जाणून घेतली. इमारत आणि परिसर चांगला असला, तरी मेन्टेनन्स होत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी येथील स्टाफबाबतही चर्चा केल्याचे सांगितले जाते.