जिल्हाधिकाऱ्यांकडून सिन्नरला मिठाईचे दुकान सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:14 AM2021-03-24T04:14:01+5:302021-03-24T04:14:01+5:30

सिन्नर: शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्वत: शहरातील रस्त्यावर फिरुन कोरोना प्रतिबंधात्मक ...

The Collector sealed the sweet shop to Sinnar | जिल्हाधिकाऱ्यांकडून सिन्नरला मिठाईचे दुकान सील

जिल्हाधिकाऱ्यांकडून सिन्नरला मिठाईचे दुकान सील

Next

सिन्नर: शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्वत: शहरातील रस्त्यावर फिरुन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली. मिठाई दुकानात नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आल्यानंतर सदर दुकान तत्काळ सील करण्यात आले.

जिल्हाधिकारी मांढरे यांनी मंगळवारी दुपारी तीन वाजता तहसील कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. बैठकीस उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, नगरपरिषदेच्या वैद्यकीय अधीक्षक वर्षा लहाटे उपस्थित होते.

शहरात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन होते की नाही याबाबत पोलीस व नगर परिषद प्रशासन यांनी संयुक्तपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना मांढरे यांनी दिल्या. ग्रामीण भागात गटविकास अधिकारी व पोलिसांनी संयुक्तपणे यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना या यंत्रणेवर पर्यवेक्षण करण्याचे आदेश त्यांनी दिले. काेरोनाचे एकूण रुग्ण व गृह विलगीकरण असलेल्या रुणांचा त्यांनी आढावा घेतला. गृह विलगीकरणाचे नियम न पाळणाऱ्या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल करुन घेण्याचे आदेशही त्यांनी दिले.

वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन ऑक्सिजन जोडणी असलेल्या खाटांची संख्या दुप्पट करणे, व्हेंटिलेटर सुविधा अद्ययावत ठेवणे तसेच डीसीएचसी व सीसीसीची एकूण क्षमता दुप्पट करणे, लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून प्रति दिन जास्तीत जास्त क्षमतेने लसीकरण पूर्ण करणे या सूचना दिल्या. मार्च २०२० ते सप्टेंबर २०२० या कालावधीतील एकूण रुग्णसंख्या व वाढीचा वेग याची सद्यस्थितीतील रुग्णवाढीच्या वेगाशी तुलना केली असता संसर्ग वाढीचा वेग जास्त असल्याने वैद्यकीय सुविधांचे बळकटीकरण करणे आवश्यक असल्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सिन्नर शहरात फिरुन पाहणी केली. शहरातील गंगावेस भागापासून ते सिन्नर बस स्थानकापर्यंत पायी फिरुन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीची तपासणी केली. यावेळी भाजी बाजारात सामाजिक अंतराचे पालन होत नसल्याची बाब दिसून आल्याने मुख्याधिकारी यांनी प्रत्येक भाजी विक्रेत्याकरिता जागेची आखणी करुन देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बाजारपेठेतील मिठाईच्या दुकानामध्ये प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे पालन होत नसल्याचे दिसून आल्याने कजरी मिठाईचे दुकान तत्काळ सीलबंद करण्यात आले. त्यानंतर मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. हॉटेलच्या तपासणीमध्ये एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने आसन व्यवस्था ठेवणे बंधनकारक असतांना त्याचे पालन होत नसल्याने संबंधित हॉटेलवर कारवाई करण्यात आली. हॉटेल, कापड दुकाने, किराणा दुकाने इत्यादी दुकानांतील सीसीटीव्ही फुटेज तपासून गर्दी होणाऱ्या, मास्क न वापरणाऱ्या व सामाजिक अंतराचे पालन न करणारी दुकाने तत्काळ सीलबंद करणेबाबत सूचना देण्यात आल्या. सक्तीच्या उपाय योजना राबविण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

फोटो ओळी- सिन्नर येथे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मिठाईच्या दुकानात जाऊन नियमांचे पालन होत नसल्याने दुकान सील केले. त्याप्रसंगी उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, मुख्याधिकारी संजय केदार व अधिकारी.

Web Title: The Collector sealed the sweet shop to Sinnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.