आस्थापनांवरील कारवाईबाबत जिल्हाधिकारी गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:15 AM2021-03-23T04:15:54+5:302021-03-23T04:15:54+5:30
गर्दीवर नियंत्रण येण्यासाठीच निर्बंध लावण्यात आलेले असताना दुकानदार आपापल्या सोयीप्रमाणे अर्थ काढून कामकाज करीत आहेत. खाद्य आणि जीवनाश्यक सेवेच्या ...
गर्दीवर नियंत्रण येण्यासाठीच निर्बंध लावण्यात आलेले असताना दुकानदार आपापल्या सोयीप्रमाणे अर्थ काढून कामकाज करीत आहेत. खाद्य आणि जीवनाश्यक सेवेच्या कक्षेत येणाऱ्या दुकानांव्यतिरिक्त अनेक हातगाड्या, ढाबे, हॉटेल्स सुरूच असल्याने गर्दीला निमंत्रण मिळत आहे. खाद्यपदार्थांसाठी ग्राहकाला बसण्याची सुविधा असली तरी त्यांना किती वाजेपर्यंत बसता येईल? पार्सल सेवा किती वाजता सुरू होते? याबाबत दुकानदार स्वत:च नियम बनवत असल्याने याबाबतच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या आहेत.
या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आता गर्दीच्या आस्थापनांवर अनिश्चित कालावधीसाठी दुकाने तसेच परवाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर जिल्हा प्रशासनानेदेखील गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेतेली आहे. महापालिकेने काही हॉटेल्सवर कारवाई केली असली, तरी कारवाईचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे त्याची परिणामकारकता नसल्याने गर्दीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले आहे. या कारवाईची व्याप्ती वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार दिलेले आहेत. या आठवड्यात आणि विशेषत: शनिवारी, रविवारी पूर्णपणे बंदच्या कालावधीत कारवाईची व्याप्ती मोठी केली जाणार असल्याचे समजते.