निर्बंध वाढवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:14 AM2021-03-07T04:14:53+5:302021-03-07T04:14:53+5:30
नाशिक : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या वेगाने वाढत आहे. अशा स्थितीत आरोग्य नियमांचे पालन केले जात नसल्याने टप्प्याटप्प्याने ...
नाशिक : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या वेगाने वाढत आहे. अशा स्थितीत आरोग्य नियमांचे पालन केले जात नसल्याने टप्प्याटप्प्याने निर्बंध कठोर करणे किंवा थेट लॉकडाऊन करणे हे दोनच पर्याय उरले आहेत. त्यामुळे परिस्थिती अधिक सुधारते की बिघडते त्यावर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे.
रुग्णसंख्या वाढत असताना त्याबाबत नागरिकांकडून कोरोनाबाबतची मार्गदर्शक तत्त्वांचे सर्रास उल्लंघन होताना दिसून येत आहे. व्यक्तिगत कारवाया करून या गोष्टींना आळा घालणे अत्यंत अवघड असल्याने अशी परिस्थिती सुरू राहिली तर काही निर्बंधांचा विचार करावा लागेल. त्यातदेखील आजपर्यंत करोडो रुपये दंड करूनदेखील नागरिकांच्या मानसिकतेत कोणताही फरक पडलेला नाही. त्यामुळे कोरोनाचे संकट वाढवून लॉकडाऊनचे संकट ओढवून घेत आहोत का? त्याचा विचारदेखील नागरिकांनी करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या परिस्थितीत टप्प्याटप्प्याने निर्बंध कठोर करणे किंवा थेट लॉकडाऊनच करण्याचे उपायच उरले आहेत. त्यामुळे आता परिस्थिती सुधारते की बिघडते त्यावरच सारे काही अवलंबून राहणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
इन्फो
बाधित संख्या ऑगस्टच्या पातळीवर
महानगरातील सक्रिय रुग्णांची संख्या गत पंधरा दिवसात वाढून दोन हजारांनी वाढून २७२३ पर्यंत पोहोचली आहे. नाशिक शहरातील बाधितांच्या संख्येने अडीच हजारांचा टप्पा ओलांडण्यास ऑगस्ट महिन्यात प्रारंभ केला होता. त्यानंतर बरोबर सहा महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्येने अडीच हजारांचा टप्पा ओलांडला आहे.