जेएनयू हल्ला निषेधार्थ नाशकात महाविद्यालये बंदचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 09:58 PM2020-01-06T21:58:34+5:302020-01-06T22:00:28+5:30
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचे देशभरात पडसाद उमटत असताना नाशिकमधील विविध विद्यार्थी संघटनांनीही एकत्र येत जेएनयूतील हल्ल्याचा निषेध करीत बुधवारी (दि.८) नाशिक शहरातील महाविद्यालये बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.
नाशिक : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचे देशभरात पडसाद उमटत असताना नाशिकमधील विविध विद्यार्थी संघटनांनीही एकत्र येत जेएनयूतील हल्ल्याचा निषेध करीत बुधवारी (दि.८) नाशिक शहरातील महाविद्यालये बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसह छात्रभारती, एआयएसएफ, एसएफ आय, सम्यक विद्यार्थीआंदोलन, आप युवा आघाडी आदी संघटनांनी सोमवारी (दि.६) सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्र येत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करीत रोष व्यक्त केला.
शहरातील विविध संघटनांच्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन निषेध व्यक्त केला. ‘लाठी, गोली की सरकार नही चलेगी’, ‘सरकार विद्यार्थीयो से डरती है, पोलीस को आगे करती है’ यांसह विविध घोषणा देत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराचा निषेध केला. यावेळी एकत्र आलेल्या विद्यार्थी संघटनांनी या आंदोलनाला आणखी तीव्र करण्याचा निर्धार केला असून, त्यासाठी शहरातील महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी केंद्र सरकार, भारतीय जनता पक्षाचा निषेध करणारे फलक हाती घेतानाच दिल्लीत पोलिसांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असून, देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला. यावेळी विराज देवांग, योगेश कापसे, तल्हा शेख, स्वप्नील घिया, भूषण काळे, प्रसाद देशमुख, समाधान बागुल, अविनाश दोंदे, गायत्री परदेशी, आस्था मांदळे, ऐश्वर्या कोळे यांच्यासह विविध विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.