विवाहपूर्व समुपदेशनाची महाविद्यालयीन तरूणाईला गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 05:37 PM2019-03-07T17:37:38+5:302019-03-07T17:37:53+5:30
मालेगाव : अगदी किरकोळ कारण व विशेषत: इगो प्रॉब्लेममुळे वैवाहिक तसेच कौटुंबिक कलहाचे वाद थेट न्यायालयात पोहोचत आहेत.
मालेगाव : अगदी किरकोळ कारण व विशेषत: इगो प्रॉब्लेममुळे वैवाहिक तसेच कौटुंबिक कलहाचे वाद थेट न्यायालयात पोहोचत आहेत. महिला कौटुंबिक कलह प्रकरणांचा आलेख तर दिवसागणिक वाढतो आहे. मालेगावच्या महिला समुपदेशन केंद्रात गेल्या सहा वर्षात ४३०० प्रकरणे दाखल झाली आहेत. वादा नंतरच्या समुपदेशनाथ तडजोड होवून २७०० दाम्पत्यांच्या रेशीमगाठी जुळवून आणण्यात येथील केंद्राला यश आले आहे. असे असले तरी भविष्यात वैवाहिक कलहाचे प्रसंग उद्भवू नये यासाठी महाविद्यालयीन तरूणाईला विवाहपूर्व समुपदेशनाची गरज निर्माण झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून कुटुंब कलहाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. छोट्या-छोट्या गोष्टींचे रूपांतर भांडणात होत आहे. सोशल मिडियाच्या अति वापरामुळे देखील पती-पत्नी वाद होण्याचे प्रकार वाढले आहेत. एकत्रित कुटुंब व्यवस्था मोडकळीस आल्यामुळे कलहाचे प्रकार दिवसागणिक वाढत आहेत. महिलांच्या बाजूने सक्षम कायदे असले तरी छळाचे व तक्रारींचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. शासन पातळीवरुन समुपदेशनासारख्या उपाययोजना केल्या जात आहे. तरी देखील इगो प्रॉब्लेममुळे छोट्या-छोट्या गोष्टींचा वाद थेट न्यायालय व पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचत आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये विवाहपूर्व समुपदेशन केंद्राची गरज निर्माण झाल्याचे जाणकारांचे मत आहे.