महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार गुणवत्ता सुधारण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 04:54 PM2020-08-07T16:54:27+5:302020-08-07T17:04:12+5:30
विद्यापीठाच्या पदवी अंतीमपूर्व परीक्षा रद्द करून उच्च शिक्षण विभागाच्या सुचनेनुसार विद्यार्थ्यांना सत्र परीक्षा व अंतर्गत गुणांच्या गणितीय सुत्राच्या आधारे निकाल देण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आला होता. परंतु, त्यामुळे काही विद्यार्थ्यांकडून नाराजीचा सुर उमटल्याने विद्यापीठाने अशा विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हिवाळी सत्राच्या परीक्षेपूर्वी स्वतंत्र परीक्षेचे नियोजन केले आहे.
नाशिक : कोविड-१९ महामारीच्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे विद्यापीठाच्या पदवी अंतीमपूर्व परीक्षा रद्द करून उच्च शिक्षण विभागाच्या सुचनेनुसार विद्यार्थ्यांना सत्र परीक्षा व अंतर्गत गुणांच्या गणितीय सुत्राच्या आधारे निकाल देण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आला होता. परंतु, त्यामुळे काही विद्यार्थ्यांकडून नाराजीचा सुर उमटल्याने विद्यापीठाने अशा विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हिवाळी सत्राच्या परीक्षेपूर्वी स्वतंत्र परीक्षेचे नियोजन केले असून त्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे अवाहन केले आहे.
विद्यापीठाच्या शैक्षणिक वेळापत्रकाचे नियोजन, परीक्षांचे आयोजन व निकाल जाहीर करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्या सुचनेनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्रथम वर्ष ते अंतीमपूर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येत आहेत. परंतु, विद्यापीठाच्या परीपत्रकानुसार जुलै २०२० परीक्षेच्या निकालानंतरही ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांना पुढील सत्रात गुणवत्ता सुधार करण्याची संधी देण्यात येणार आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेच्या विषयांमध्ये गुणवत्ता सुधारण्यासाठी स्वतंत्ररीत्या हिवाळी सत्राच्या परीक्षेपूर्वी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना २०२० च्या परीक्षेचे अर्ज भरण्याची संधी उपलब्ध होऊ शकणार आहे.
परीक्षा अर्ज भरण्याची मूदत
गुणवत्ता सुधारण्यााठी ३१ जुलै २०२० पर्यंत ज्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना १६ ऑगस्ट २०२० पर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे. तर ज्या परीक्षांचे निकाल ५ ऑगस्टनंतर जाहीर करण्यात येणार आहेत, त्यांच्यासाठी निकाल जाहीर झाल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून पुढील दहा दिवसांमध्ये अर्ज सादर करण्याची मूदत राहणार आहे. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी उन्हाळी २०२० च्या परीक्षेचे अर्ज भरलेले आहेत व विद्यार्थ्यांच्या ज्या विषयांना गणितीय सुत्राचा वापर करून गुण प्रदान करण्यात आलेले आहेत, त्याच विषयांना गुणवत्ता सुधारण्याची संधी मिळणार आहे. तसेच अशा विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता सुधारण्यासाठी नियोजित परीक्षेचे कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. उन्हाळी २०२० परीक्षेसाठी पहिल्यांदाच अर्ज करणाºया विद्यार्थ्यांचे गुणदान गणितीय सुत्रानुसार करण्यात आलेले आहे, केवळ अशाच विद्यार्थ्यांना कमीत कमी एक व जास्तीत जास्त सर्व लेखी परीक्षेच्या विषयांसाठी गुणवत्ता सुधारण्यासाठी अर्ज करता येणार असल्याचे विद्यापीठाने प्रसिद्धी परीपत्रकाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.