रंगपंचमीचा रंग फिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:14 AM2021-04-04T04:14:56+5:302021-04-04T04:14:56+5:30
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांमुळे कुठेही रहाडी खुल्या न झाल्याने यंदा रंगपंचमीचा रंग फिका पडला. केवळ बालगोपाळांनी आपापल्या ...
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांमुळे कुठेही रहाडी खुल्या न झाल्याने यंदा रंगपंचमीचा रंग फिका पडला. केवळ बालगोपाळांनी आपापल्या सोसायटीत थोड्याफार प्रमाणात रंगपंचमी साजरी केली.
दरवर्षी नाशिकमध्ये रंगपंचमीपूर्वी खुल्या केल्या जाणाऱ्या रहाडींची परंपरा यंदा खंडित झाली. रहाडी नसल्याने तसेच कोरोनाचा वाढत्या प्रसाराची धास्ती असल्याने प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठांनी तरुणाईलादेखील रंगपंचमी साजरी न करण्याबाबत सांगितल्याने रंगपंचमीचा नेहमीचा रंग, दिवसभर रंगात न्हाऊन सर्वत्र फिरणारी, गंगेत बुडी मारणारी तरुणाई यंदा दिसलीच नाही. केवळ काही सोसायट्यांमध्येच बालगोपाळांनी एकत्र येत थोड्याफार प्रमाणात कोरडे रंग किंवा केवळ पाणी उडवत रंगपंचमी साजरी केली.
इन्फो
राममंदिरात परंपरेचे पालन
नाशिकचे आराध्य दैवत असलेल्या काळारामाच्या मूर्तीवर शुक्रवारी परंपरेनुसार श्वेतवस्त्र परिधान करण्यात आले. त्यानंतर केशर, चंदन, कापूर हे दुधात उगाळून रंग तयार करून तो फुलाव्दारे शिंपडून वंदन करण्यात आले. यंदाच्या वर्षाचे मानकरी विलास बुवा पुजारी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. तसेच नजीकच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही रंगोत्सवाच्या परंपरेचे पालन करण्यात आले.