ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रांची रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:52 AM2019-09-03T00:52:50+5:302019-09-03T00:53:08+5:30

मतदान यंत्रांविषयी असलेली शंका तसेच काही प्रश्न असतील तर त्यांचे समाधान व्हावे यासाठी राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत मंगळवार (दि.३) पासून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्र कार्यप्रणालीची रंगीत तालीम करण्यात येणार आहे.

 Color training of EVMs, VVPAT devices | ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रांची रंगीत तालीम

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रांची रंगीत तालीम

Next

नाशिक : मतदान यंत्रांविषयी असलेली शंका तसेच काही प्रश्न असतील तर त्यांचे समाधान व्हावे यासाठी राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत मंगळवार (दि.३) पासून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्र कार्यप्रणालीची रंगीत तालीम करण्यात येणार आहे. सदर यंत्रांची कार्यपद्धती, अचूक क्रिया आणि योग्य मतदान पडते किंवा नाही याची प्रत्यक्ष पडताळणी करण्याची संधी राजकीय पक्षांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना या रंगीत तालीमप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
मतदान ज्या यंत्राच्या साह्याने केले जाते त्या यंत्रणेविषयी काही राजकीय पक्षांनी शंका उपस्थित केली असून, देशभरात याविषयीचे अनेक मतप्रवाह निर्माण झालेले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर तर ईव्हीएमविषयी अधिक संशय व्यक्त करण्यात आल्यामुळे मोठे राजकीय वादळही उठले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्टÑात विधानसभा निवडणूक होत असून, सदर निवडणूक पारदर्शक पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक विभागाला सूचना केलेल्या असून, त्यानुसार राजकीय पक्षांना यंत्राची कार्यपद्धती पडताळण्याची संधी निवडणुकीपूर्वी मिळणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाने संपूर्ण तयारी केली असून, निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या सुमारे २१ हजार यंत्रांची पडताळणीदेखील पूर्ण करण्यात आलेली आहे. निवडणुकीसाठी प्राप्त झालेले ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन या अंबड येथील सेंट्रल वेअर हाऊस गुदामात ठेवण्यात आलेल्या असून मंगळवारी सकाळी ११ वाजता या ठिकाणी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोरच या यंत्रांची रंगीत तालीम घेतली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या यंत्रांविषयीचा गैरसमज दूर करण्यासाठी सदर उपक्रम असल्याने राजकीय पक्ष नेत्यांनी संबंधित ठिकाणी सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे. सदर रंगीत तालीम ही मंगळवारपासून पाच दिवस सुरू राहणार आहे.
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उपयोगात येणाºया इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स आणि व्हीव्हीपॅट यंत्रांवरील अभिरूप मतदान अर्थात मॉक पोली प्रक्रियेसाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी व त्यांच्या जबाबदार प्रतिनिधी यांनी उपस्थित राहून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स व व्हीव्हीपॅट यंत्राबद्दलच्या आपल्या सर्व शंकांचे निरसन करून घ्यावे
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी

Web Title:  Color training of EVMs, VVPAT devices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.