नाट्य स्पर्धांच्या रंगीत तालमींना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:48 AM2019-07-25T00:48:57+5:302019-07-25T00:49:16+5:30
महानिर्मिती कंपनीच्या होऊ घातलेल्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांची तयारी सुरू झाली असून, एकलहरे येथील प्रशासकीय इमारतीच्या हॉलमध्ये नाट्यप्रेमींच्या रंगीत तालमीला सुरुवात झाली आहे.
एकलहरे : महानिर्मिती कंपनीच्या होऊ घातलेल्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांची तयारी सुरू झाली असून, एकलहरे येथील प्रशासकीय इमारतीच्या हॉलमध्ये नाट्यप्रेमींच्या रंगीत तालमीला सुरुवात झाली आहे.
यंदा राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा १९ ते २३ आॅगस्ट दरम्यान नाशिकच्या कालिदास कलामंदिरात घेण्यात येणार असून, या स्पर्धेत एकलहरे, कोराडी, पोफळी, चंद्रपूर, परळी, खापरखेडा, भुसावळ, पारस, उरण या विद्युत केंद्रातील रंगकर्मी आपापली नाटके सादर करतील. या स्पर्धेत नाशिक औष्णिक विद्युत केंद्र, एकलहरेतर्फे विद्यासागर अध्यापक लिखित व चंद्रकांत जाडकर दिग्दर्शित दर्द-ए-डिस्को या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. या नाटकाची तालीम एकलहरे प्रशासकीय इमारतीमागील पगार वाटप हॉलमध्ये सुरू करण्यात आली. यावेळी मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांच्या हस्ते नटराज व संहिता पूजन करण्यात आले. कल्याण अधिकारी निवृत्ती कोंडावले यांनी प्रास्ताविक केले. उपमुख्य अभियंता मोहन आव्हाड, राकेशकुमार कमटमकर, मनोहर तायडे, प्रवीण काळोखे आदी उपस्थित होते. संहिता पुजनानंतर दिग्दर्शक चंद्रकांत जाडकर यांनी नाटकात भाग घेतलेल्या कलाकारांशी हितगूज साधून संहिता वाचन करून घेतले.