कळसूबाई शिखरावरील मंदिराची केली रंगरंगोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 05:40 PM2018-10-05T17:40:28+5:302018-10-05T17:41:00+5:30
नवरात्रोत्सव : कळसूबाई मित्र मंडळाचा उपक्रम
इगतपुरी : अवघ्या काही दिवसावर नवरात्रोत्सव येऊन ठेपल्याने घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील सर्वात उंच असणाऱ्या कळसुबाई शिखरावरील कळसुबाई मंदिराची रंगरंगोटी आणि साफसफाई केली.
गेल्या २२ वर्षांपासून कळसुबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली गिर्यारोहक नवरात्रीच्या दिवसांत पहाटे कळसुबाई शिखरावर जाऊन रोज कळसुबाई मातेची महाआरती करतात. मंडळाकडून नवरात्रीत नऊही दिवस घोटीपासून कळसुबाई शिखरापर्यंत गिर्यारोहन केले जाते. मंडळाच्या गिर्यारोहकांनी नवरात्री उत्सवाची जय्यत तयारी म्हणून कळसुबाई शिखरावर जाऊन कळसुबाई मातेच्या मंदिराची सालाबादप्रमाणे नव्याने रंगरंगोटी केली. मंदिराच्या परिसराची साफसफाई करण्यात आली. या उपक्रमात कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक अध्यक्ष भगीरथ मराडे, अशोक हेमके, गजानन चव्हाण, दीपक बेलेकर, बाळु आरोटे, बालाजी तुंबारे, निलेश आंबेकर, संतोष म्हसने, प्रशांत जाधव, शिवा गायकवाड, संदीप परदेशी, प्रवीण भटाटे, नितीन भागवत आदी गिर्यारोहक सहभागी झाले होते.