पोलिसांची रंगीत तालीम अन् सुरक्षित अंतराचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 01:06 AM2020-08-20T01:06:51+5:302020-08-20T01:07:18+5:30
गणेशोत्सव, मोहरम सणाच्या काळात काही अनुचित प्रकार घडला तर पोलिसांची कुमक किती वेळात पोहोचू शकते याचा अंदाज घेण्यासाठी बुधवारी दुपारी देवळाली गाव, राजवाडा येथे पोलिसांनी रंगीत तालीम केली. मात्र यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.
नाशिकरोड : गणेशोत्सव, मोहरम सणाच्या काळात काही अनुचित प्रकार घडला तर पोलिसांची कुमक किती वेळात पोहोचू शकते याचा अंदाज घेण्यासाठी बुधवारी दुपारी देवळाली गाव, राजवाडा येथे पोलिसांनी रंगीत तालीम केली. मात्र यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी दीड वाजता देवळालीगाव राजवाडा येथे मॉक ड्रिल घेण्यात आले. पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, सुनील रोहोकले, संजय देशमुख आदी अधिकारी दाखल झाले. मात्र पोलिसांची गर्दी बघून परिसरात अफवा पसरल्या होत्या अवघ्या अर्ध्या तासात मॉक ड्रिल संपल्यानंतर सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी आपापल्या वाहनांमध्ये निघून गेले.
रंगीत तालमी निमित्त उपस्थित पोलीस कर्मचारी हे जेव्हा रांगेत उभे राहिले तेव्हा सोशल डिस्टन्सिंग पाळले गेले नाही. तसेच मॉक ड्रिल बघण्याकरिता आजूबाजूचे रहिवासी, युवक, मुले, महिला यांचीदेखील गर्दी झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. पावसाचे आगमन झाल्यावर आडोशाला उभे असलेले पोलीस, परिसरातील रहिवासी यांच्यामध्ये खूप कमी अंतर होते. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोना विषयी पुन्हा भीती व्यक्त करण्यात आली.