राष्टपती दौऱ्याची आज रंगीत तालीम : मांगीतुंगी येथे विश्वशांती संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 01:37 AM2018-10-20T01:37:50+5:302018-10-20T01:38:20+5:30
राष्टपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत मांगीतुंगी येथे विश्वशांती संमेलन होणार असल्याने राष्टपतींच्या सुरक्षेच्या दृष्टीने शनिवारी सुरक्षाव्यवस्था तसेच हेलिकॉप्टरची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे.
नाशिक : राष्टपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत मांगीतुंगी येथे विश्वशांती संमेलन होणार असल्याने राष्टपतींच्या सुरक्षेच्या दृष्टीने शनिवारी सुरक्षाव्यवस्था तसेच हेलिकॉप्टरची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. सोमवार, दि. २२ आॅक्टोबर रोजी राष्टपती कोविंद हे सहपत्नी ओझर येथे विशेष विमानाने दाखल होणार असून, तेथून ते हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने मांगीतुंगी येथे रवाना होतील. त्यांच्यासमवेत राज्यपाल सी. विद्यासागर, मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस हे राहणार आहेत. याशिवाय राज्याचे पोलीस महासंचालक, मुख्यसचिव असा मोठा लवाजमा असणार असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जय्यत तयारी केली जात आहे. या तयारीचाच भाग म्हणून ओझर येथे हवाई दलाचे तीन हेलिकॉप्टर दाखल झाले असून, शनिवारी ते ओझर ते मांगीतुंगी अशी रंगीत तालीम करतील. मांगीतुंगी येथे हेलिकॉप्टर उतरण्यात येणाºया अडचणी यानिमित्ताने जाणून घेण्यात येणार असून, त्याच धर्तीवर पोलीस यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने रंगीत तालीम घेणार आहे.