मंगळवारी होणार रंगयुद्ध : ढोलताशाच्या गजरात रंगांची उधळण रंगपंचमीसाठी येवला सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 11:58 PM2018-03-03T23:58:58+5:302018-03-03T23:58:58+5:30
येवला : उत्सवप्रेमींचे शहर म्हणून येवला शहर ओळखले जाते. रंगपंचमीनिमित्त निर्माण होणारे इंद्रधनुष्याचे मनोहारी दृश्य केवळ वर्णन करून भागणार नाही.
येवला : उत्सवप्रेमींचे शहर म्हणून येवला शहर ओळखले जाते. रंगपंचमीनिमित्त निर्माण होणारे इंद्रधनुष्याचे मनोहारी दृश्य केवळ वर्णन करून भागणार नाही, तर रंगपंचमीची मजा लुटण्यासाठी येवल्याला यावे लागेल. या दिवशी सकाळपासूनच गल्लीबोळात परस्परांवर रंग टाकत स्वत:चीच तोंडे आकर्षक पद्धतीने रंगवून घेत युवक-युवतींचे थवे फिरत असतात. महिलादेखील रंग खेळण्यात आघाडीवर असतात. रंगपंचमी आली की शहरातील दोन्ही दिशेच्या तालमी आणि विविध मंडळे परस्परांच्या विरुद्ध दिशेने येऊन बैलगाडीवर ठेवलेल्या पिंपांतील रंग ढोलताशा, हलकडीच्या गजरात परस्परांवर उधळून मजा लुटतात. किमान ४० ते ५० बैलगाड्या व त्यावर असणाºया पिंपांतील रंगांचे सपके परस्परांवर मारून रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे. गेल्या २० ते २५ वर्षांपासून बैलगाड्यांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीमुळे पिंपांची संख्या वाढली आहे. रंग खेळणाºयांची संख्याही वाढली आहे. रंगाचा पहिला सामना मंगळवारी (दि.६) सायंकाळी ५ वाजता टिळक मैदानात होईल. ढोलताशांच्या गजरात जोशपूर्ण वातावरणात प्रत्येक तरुण रंगात न्हाऊन निघणार आहे. डी.जे. रोडवर एक सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. रंगपंचमीचा उत्साह दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा या पारंपरिक रंगांचे सामने आनंदाने उत्साहात पार पडावेत म्हणून विविध नेतेमंडळी, पहिलवान काळजी घेत आहेत.
होळी ते रंगपंचमी अशा पाच दिवसात बालाजी मंदिराच्या प्रांगणात बालाजीचा उत्सव धूमधडाक्यात साजरा होतो. आराध्य दैवत बालाजी यांना पाळण्यात बसविले जाते. सोबत मंडप, विद्युत दिव्यांचा झगमगाट असतो. परंपरागत पणत्यांची रोषणाई वेगळीच छाप पाडते. या पणत्यांच्या तेलासाठी आजही येवल्यातील गंगाराम छबीलदासशेठ पेढीतून खर्च दिला जातो. ही एक जुनी परंपरा आहे. या पेढीतील व्यक्ती आजही रंगपंचमीच्या दिवशी रात्री ८ वाजता बालाजी मंदिर परिसरात येतात. बालाजीच्या अंगावर रंग व गुलाल उधळतात. या मंदिराचे पुजारी बालाजीचे दूत बनून शेठजींच्या अंगावर रंग उडवतात. देव आणि मानव यांच्यात जणूकाही प्रातिनिधिक स्वरुपात रंगपंचमी खेळली जाते. अनेक वर्षांची ही परंपरा आजही तेवढ्याच उत्साहाने सुरू आहे हे विशेष. रात्री ८ वाजता क्षत्रिय गल्लीतून ढोलताशांच्या गजरात सटवाईच्या सोंगाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. सटवाई देवतेपुढे वेताळाचे सोंग घेण्याची येथील यमासा क्षत्रिय यांच्या कुटुंबाची प्रथा आहे.