नाटकांच्या रंगीत तालमींना वेग
By admin | Published: November 15, 2015 10:57 PM2015-11-15T22:57:45+5:302015-11-15T22:58:11+5:30
माहोल तयार : राज्य नाट्य स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात
नाशिक : येत्या मंगळवारपासून शहरात (दि. १७) रंगणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, रंगकर्मींच्या रंगीत तालमींना वेग आला आहे. विशेषत: पहिल्या आठवड्यात नाटके असलेल्या चमूंची सध्या युद्धपातळीवर धावपळ सुरू आहे.
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात १७ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार असून, स्पर्धेत एकूण २१ नाटके सादर होणार आहेत. त्यांत नाशिकच्या १९ नाटकांचा समावेश आहे. संचालनालयाकडून नाटकांना हिरवा कंदील मिळाल्यानंतर या संस्थांनी सुमारे दोन महिन्यांपासून कलावंतांच्या भूमिकांची निश्चिती, नेपथ्याची रचना, वेशभूषा-केशभूषा, त्यासाठी साहित्याची जमवाजमव सुरू केली होती. आता त्यांच्या तयारीवर अंतिम हात फिरवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शहरातील संबंधित ठिकाणे युवा रंगकर्मींनी गजबजून जात असून, नाटकाविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत. गेल्या वर्षी लोकहितवादी मंडळाच्या ‘न हि वैरेन वैराणि’ या नाटकाने अंतिम फेरीत प्रथम पारितोषिक पटकावल्याने शहरातील रंगकर्मींचा उत्साह वाढला असून, त्याचा परिणाम तालमींवरही दिसून येत आहे.