एकत्रित श्रमदानातून दुष्काळावर मात शक्य : भटकळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 01:04 AM2018-10-29T01:04:00+5:302018-10-29T01:05:01+5:30
राज्यातील ४५ हजार गावांंमधील ग्रामस्थांनी राळेगणसिद्धी व हिवरे बाजारमध्ये श्रमदानातून झालेला कायापालट डोळ्यासमोर ठेवत एकत्रित श्रमदान केल्यास पुढील दहा ते पंधरा दुष्काळावर मात करणे शक्य आहे, असे प्रतिपादन पानी फांउडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी केले आहे.
नाशिक : राज्यातील ४५ हजार गावांंमधील ग्रामस्थांनी राळेगणसिद्धी व हिवरे बाजारमध्ये श्रमदानातून झालेला कायापालट डोळ्यासमोर ठेवत एकत्रित श्रमदान केल्यास पुढील दहा ते पंधरा दुष्काळावर मात करणे शक्य आहे, असे प्रतिपादन पानी फांउडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी केले आहे. महाराष्ट्र सेवा समाज संघातर्फे रचना विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परशुराम साइखेडकर नाट्यगृहात रविवारी (दि. २८) शांता लिमये स्मृती व्याख्यानमालेत जलसाक्षरता विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत धामणे होते. व्यासपीठावर विजय डोंगरे, डॉ. शोभा नेर्लीकर, डॉ. विनायक नेर्लीकर, ना. सी. पाटील उपस्थित होते.
सत्यजित भटकळ म्हणाले, स्त्री-भ्रूण हत्या, घनकचरा व्यवस्थापन यांसारखे अनेक प्रश्न सर्वसामान्यांपुढे असून, या प्रश्नांची उत्तरेही शोधणारही आपल्याकडे आहेत. राज्यातील सर्व गावांसोबतच शहरवासीयांनीही श्रमदानाचे आणि ज्ञान विद्याप्रसाराचे महत्त्व लक्षात घेऊन राळेगण सिद्धी व हिवरे बाजार यांसारख्या गावांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. दुष्काळावर मात करण्यासाठी कितीही योजना आणल्या त्यावर अब्जावधी रुपये खर्च केले तरीही आजही पाणीप्रश्न संपुष्टात आलेला नाही. हा प्रश्न सोडविण्यासठी पानी फाउंडेशनच्या माध्यमातून काम सुरू आहे. दरम्यान, रचना विद्यालयातील विद्यार्थिनींनी पाणी वाचविण्याचा संदेश देणारे गीत सादर केले. सुधाकर साळी यांनी प्रास्ताविक केले. प्रज्ञा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. शांताराम आहिरे यांनी आभार मानले.