नाशिकमध्ये थेट सीएनजी वाहिनी येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:56 AM2018-10-31T00:56:43+5:302018-10-31T00:57:34+5:30
नाशिक : पारंपरिक इंधनाला पर्याय असलेली सीएनजी गॅसची थेट वाहिनी जव्हारपासून नाशिक शहरात आणण्यात येणार असून, त्यामुळे मोठा स्वस्त ...
नाशिक : पारंपरिक इंधनाला पर्याय असलेली सीएनजी गॅसची थेट वाहिनी जव्हारपासून नाशिक शहरात आणण्यात येणार असून, त्यामुळे मोठा स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे सीएनजी नाशिकमध्ये सुरू व्हावे यासाठी महापालिकादेखील या कंपनीस सहकार्य करीत आहेत.
पेट्रोल आणि डिझेल दराच्या तुलनेत स्वस्त आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी नागरिकांची मागणी आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिल्ली येथे यासंदर्भात प्रयत्न करताना नाशिकमध्ये सीएनजीचे पंप उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला होता; परंतु उपयोग झाला नव्हता. दरम्यान, आता नाशिक महापालिकेच्या वतीने शहर बससेवा सुरू करण्यात येणार असून, त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार दोनशे बस इलेक्ट्रिकल तर दोनशे सीएनजीवर चालणाऱ्या असणार आहेत. त्यामुळे महापालिकेने खासगी कंपनीलादेखील बळ दिले आहे. जव्हार येथून पाइपद्वारे सीएनजी गॅस आणला जाणार असून, नाशिकमध्ये प्रक्रिया करून तो वाहनांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
यासंदर्भात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या सूचनेनुसार प्रशासनाने संबंधित कंपनीच्या अधिकाºयांबरोबरच सर्व्हे केला असून, प्रक्रियेसाठी कंपनीने सुमारे तीन ते चार एकर जागेची मागणी केली असून, तीदेखील भाड्याने देण्याबाबत तयारी सुरू असल्याचे वृत्त आहे. पर्यावरणास उपयुक्त आणि पेट्रोल-डिझेलच्या दराच्या तुलनेत अत्यल्प दर अशाप्रकारचे इंधन नाशिककरांसाठी उपयुक्त ठरणार आहे.