पाणी सोडण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:26 AM2018-03-16T00:26:54+5:302018-03-16T00:26:54+5:30
येवला : तालुक्यातील बोकटे येथे श्री कालभैरवनाथ यात्रोत्सवासाठी लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लेखी पत्राद्वारे केली होती. त्यानुसार महाजन यांच्या आदेशानंतर यात्रेसाठी तत्काळ पाणी सोडण्यात आले आहे.

यासंदर्भात येवल्याच्या शिष्टमंडळाने महाजन यांची भेट घेतली. यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, येवला पंचायत समितीचे माजी सभापती रामदास पाटील, काळे, बाळासाहेब लोखंडे उपस्थित होते. आमदार छगन भुजबळ यांनी जलसपंदा मंत्री गिरीश महाजन यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ७ एप्रिल २०१८ पासून बोकटा, ता. येवला, जि. नाशिक येथे श्री कालभैरवनाथ यात्रोत्सव होत आहे. या परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. दररोज परिसरातील हजारो नागरिक येथील यात्रेला येत असतात. मागील वर्षातील भीषण दुष्काळाचा अपवाद वगळता येथील नागरिक व यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून दरवर्षी पाणी सोडले जाते. पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नामुळे यात्रेसाठी पाणी सोडण्याची ग्रामपंचायत व स्थानिक लोकप्रतिनिधींची आग्रही मागणी आहे. त्यामुळे येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन लवकरात लवकर पालखेड डावा कालव्याद्वारे प्रासंगिक आरक्षणाचे पाणी सोडण्यात यावे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. त्यानंतर तत्काळ राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बोकटे यात्रेसाठी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत.