सेनापती तात्या टोपे स्मारकाची जागा बदलण्याचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:14 AM2018-03-28T00:14:22+5:302018-03-28T00:14:22+5:30
येवल्याचे भूमिपुत्र आणि १८५७ च्या उठावातील सेनानी तात्या टोपे यांचे येवल्यातील नियोजित स्मारक उचित जागी व्हावे, यासाठी सेनापती तात्या टोपे राष्ट्रीय नवनिर्माण समितीच्या पदाधिकाऱ्यांची व पालखेड पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांची महत्त्वपूर्ण बैठक खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथे सिंहगड विश्रामगृहात सोमवारी पार पडली. त्यात जागा बदलण्याचे संकेत मिळाले असून, समितीने चर्चा यशस्वी झाल्याचे सांगितले आहे.
येवला : येवल्याचे भूमिपुत्र आणि १८५७ च्या उठावातील सेनानी तात्या टोपे यांचे येवल्यातील नियोजित स्मारक उचित जागी व्हावे, यासाठी सेनापती तात्या टोपे राष्ट्रीय नवनिर्माण समितीच्या पदाधिकाऱ्यांची व पालखेड पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांची महत्त्वपूर्ण बैठक खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथे सिंहगड विश्रामगृहात सोमवारी पार पडली. त्यात जागा बदलण्याचे संकेत मिळाले असून, समितीने चर्चा यशस्वी झाल्याचे सांगितले आहे. येवल्यात सेनापती तात्या टोपे यांचे साडेदहा कोटी रुपये खर्चाचे स्मारक नियोजित आहे. पाणीपुरवठा साठवण तलावाजवळील जागेवर हे स्मारक व्हावे, असा ठराव पालिकेने केला आहे; परंतु पालिकेने प्रस्तावित केलेली ही जागा गैरसोयीची व अडगळीची असल्याने हे स्मारक नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील अंगणगाव शिवारात तीन हेक्टर ३५ आर. या शासनाच्या जलसंपदा विभागाच्या जागी व्हावे, असा आग्रह समितीने नाशिक येथील बैठकीत धरला. समिती सदस्यांनी चर्चेत भाग घेताना जागा बदलाचा आग्रह धरला आणि खासदार चव्हाण यांनी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. बैठकीसाठी डॉ. किशोर पहिलवान, धनंजय कुलकर्णी, सुभाष पहिलवान पाटोळे, रमेश भावसार, श्रावण जावळे, युवराज पाटोळे, सुनील सस्कर, संजय सोमसे, राहुल भावसार उपस्थित होते.
समितीचा विश्वास
पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण आणि जलसंपदा प्रशासन स्मारकाच्या उचित जागेसाठी कृतीतून अनुकूलता दाखवत असताना येवला पालिकेचे लोकप्रतिनिधी उदासीनता का दाखवत आहेत, असा सवाल या बैठकीत उपस्थित झाला. तात्या टोपे यांच्या स्मारकासाठी नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील जागा उपलब्ध होण्यासाठी मार्ग मोकळा असल्याचा विश्वास निर्माण झाला.
स्मारक नाशिक-औरंगाबाद महामार्गालगत व्हावे यासाठी समितीने सुचवलेल्या जागीच होण्यासाठी मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, उत्तर महाराष्ट्र प्रदेश, नाशिक यांनी तयारी दाखवत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेने सहमती दर्शविली. व या संबंधीचा प्रस्ताव कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद यांच्याकडे नकाशासह तत्काळ पाठवल्याची माहिती कार्यकारी अभियंता राघवेंद्र भाट यांनी खासदार चव्हाण व समिती सदस्यांना दिली.