मौजे सुकेणेतील दत्त यात्रोत्सवास प्रारंभ; रंगांची उधळण अन् भक्तीचा जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 04:27 PM2023-03-13T16:27:42+5:302023-03-13T16:28:47+5:30
पालखी सोहळा : पहिल्याच दिवशी राज्यभरातील सुमारे पाऊण लाख भाविकांची हजेरी
योगेश सगर
कसबे सुकेणे (नाशिक) : रंगाची उधळण, भक्तीचा जल्लोष आणि भाविकांची मांदियाळी अशा भक्तिमय वातावरणात रंगपंचमीला देशभरातील महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थस्थळ असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त पालखी सोहळा उत्तरोउत्तर रंगी रंगला. यात्रेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यासह राज्यभरातील सुमारे पाऊण लाख भाविकांनी दत्त दर्शनाचा लाभ घेतला आहे. रंगाची यात्रा म्हणून सर्वदूर परिचित असलेली व राज्यातील लाखो महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त यात्रोत्सवास रंगपंचमीपासून प्रारंभ झाला. पालखीपुढे उधळणारा रंग हा भाविक प्रसाद म्हणून अंगावर घेतात, अशी येथे श्रद्धा आहे. त्यामुळे हा पालखी सोहळा पाहण्यासाठी व नवसपूर्तीसाठी या ठिकाणी राज्यभरातून भाविक दाखल होतात. यंदाही हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
रंगपंचमीला दुपारी साडेतीन वाजता पूर्व महाप्रवेशद्वार येथे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष महंत मनोहरशास्री सुकेणेकर, अर्जुनराज सुकेणेकर, बाळकृष्णराज सुकेणेकर, राजधरराज सुकेणेकर, पूज्य गोपीराज शास्त्री सुकेणेकर आदी सुकेणेकर संत परिवाराने यांनी देवास विडा अवसर करून स्थानवंदना केली. भाजपचे युवा नेते यतीन कदम व उपसरपंच सचिन मोगल यांच्या हस्ते पालखी पूजन, आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते चरणांकित स्थानपूजा तर मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, उपसभापती डी. बी. मोगल यांच्या हस्ते दुपार आरती झाली. यावेळी प्रतापराव मोगल, डॉ. किरण देशमुख, संग्राम मोगल, पंकज भंडारे, हेमंत भंडारे, माधवराव मोगल, रामराव मोगल, दिलीप खापरे, अशोक मोगल, प्रितेश भराडे, मौजे सुकेणे व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे लाखो भाविक, भक्तीचा जल्लोष आणि रंगांची उधळण, डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई असा उत्साह सुकेणेत पाहावयास मिळाला. रात्री उशिरा पालखीचे पुरातन विसावा पारावर आगमन झाले. सनईच्या मंजूळ सुरात पहाटे तीन वाजता पालखी पुन्हा परतीच्या मार्गाला लागली तर पहाटे साडेपाच वाजता मंदिरात पोहोचली. रंगपंचमी खेळण्याची शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या मौजे सुकेणेची यात्रा रंगाची यात्रा म्हणूनही राज्यात प्रसिद्ध आहे.