जिल्हा रुग्णालयामध्ये पोस्ट कोविड केअर सेंटरला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:22 AM2020-12-05T04:22:18+5:302020-12-05T04:22:18+5:30

नाशिक : कोविड-१९ मधून बरे झाल्यानंतर रुग्णांना काही समस्या उद‌्भवल्यास मार्गदर्शन अथवा सल्ला घेण्यासाठी पोस्ट कोविड केअरची ...

Commencement of Post Covid Care Center at District Hospital | जिल्हा रुग्णालयामध्ये पोस्ट कोविड केअर सेंटरला प्रारंभ

जिल्हा रुग्णालयामध्ये पोस्ट कोविड केअर सेंटरला प्रारंभ

Next

नाशिक : कोविड-१९ मधून बरे झाल्यानंतर रुग्णांना काही समस्या उद‌्भवल्यास मार्गदर्शन अथवा सल्ला घेण्यासाठी पोस्ट कोविड केअरची आवश्यकता लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयात अशा रुग्णांसाठी पोस्ट कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे.

कोरोनापश्चात पुरेशी औषधे किंवा दक्षता न घेतलेल्या व्यक्तींना काही विशिष्ट प्रकारचे आजार जडत असल्याच्या घटना घडत असल्याने या सेंटरच्या कामकाजाला प्रारंभ करण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार जे लोक कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर आले आहेत अशा व्यक्तींना हृदय, किडनी, लिव्हर यासंबंधी समस्या उद‌्भवत आहेत, तर कांही रुग्णांना फुप्फुसांची समस्या उद‌्भवते. या आजारात फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होते, परिणामी श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे कोरोनातून बाहेर आल्यानंतरही अशा रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टची आवश्यकता भासू शकते. अनेकदा बरे होऊन घरी गेलेल्या काही रुग्णांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होत असल्याचे समोर आले आहे. परिणामी काहींना हृदयविकाराने प्राण गमवावा लागला आहे. या गुठळ्या शरीरात दूरवर पसरलेल्या रक्तवाहिन्यांमध्येदेखील होत आहेत. काही रुग्णांमध्ये मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या झाल्याने पक्षघात होण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे कोविड-१९ तून बरे झाल्यानंतर उद‌्भवत असलेल्या आजारांपासून बचावासाठी रुग्णांना योग्य तो वैद्यकीय सल्ला व उपचार मिळावे यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन अशी व्यवस्था कार्यान्वित केली आहे. कोविड-१९ मधून बरे झालेल्या रुग्णांसाठी त्यानंतरचे ४ महिने काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे वेगवेगळ्या निष्कर्षांतून समोर आले आहे. त्यामुळे अशा रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पोस्ट कोविड केअर सेंटर उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

इन्फो

जिल्हा रुग्णालयाचा पुढाकार

सामान्य नागरिकांची गरज लक्षात घेऊन पोस्ट कोविड सेंटरला प्रारंभ करण्यात आला असून, त्याला चांगला प्रतिसादही मिळू लागला आहे. अद्याप शासनाकडून अशा प्रकारचे सेंटर सुरू करण्याचा आदेश आलेला नसून जिल्हा रुग्णालयानेच याकामी पुढाकार घेतला आहे.

डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा शल्य चिकित्सक

Web Title: Commencement of Post Covid Care Center at District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.