जिल्ह्यात खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:15 AM2021-03-05T04:15:58+5:302021-03-05T04:15:58+5:30
नाशिक : शासनाच्या निर्देशानुसार खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांमधील लसीकरणाच्या प्रकीयेला गुरुवारपासून प्रारंभ झाला. नाशिक शहरातील ५ तर जिल्ह्याच्या ...
नाशिक : शासनाच्या निर्देशानुसार खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांमधील लसीकरणाच्या प्रकीयेला गुरुवारपासून प्रारंभ झाला. नाशिक शहरातील ५ तर जिल्ह्याच्या अन्य भागातील ४४ रुग्णालय अशा एकूण ४९ रुग्णालयांमध्ये या लसीकरणास प्रारंभ झाला आहे.
जिल्हाभरातील खासगी हॉस्पिटल्समधील कर्मचाऱ्यांना कोरोना लसीबाबत प्रशिक्षण देण्याचे काम बुधवारी पूर्ण झाले. त्यामुळे गुरुवारपासून खासगी हॉस्पिटल्समध्ये लसीकरणाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि काेमॉर्बिड रुग्णांसाठी लसीकरण सेवा मिळणे आता खासगी रुग्णालयांमध्येदेखील शक्य झाले आहे.या लसीकरणासाठी मोबाइलमधील को-विन ॲपवरून नोंदणी करणे तसेच निर्धारित कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यामुळे केंद्रावर जाऊन मग नोंदणी करण्यातून होणारी गर्दी किंवा रांगांमुळे लसीसाठी प्रदीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता कमी होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना नाव नोंदणीसाठी अडचणी येत असतील तर अशा व्यक्ती थेट लसीकरण केंद्रावर जाऊ शकतात. त्याशिवाय पात्र लाभार्थी त्यांच्या सोईनुसार केंद्राची निवड करू शकतात. तसेच उपलब्ध वेळेअंतर्गत लसीकरणासाठी वेळ निवडण्याचीदेखील मुभा देण्यात आली आहे. ४५ ते ५९ वर्षांच्या व्यक्ती गंभीर आजारांना तोंड देत असतील तर अशांनाही कोरोना लस देण्यात येणार आहे. प्रत्येक नागरिकाच्या एका मोबाइल क्रमांकावरून चार लाभार्थींची नोंदणी करता येणार आहे. या प्रक्रियेदरम्यान जवळचे सरकारी किंवा खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्र, तारीख व वेळ निवडता येणार आहे. लसीविषयी कोणतीही शंका नागरिकांनी बाळगण्याची आवश्यकता नाही, तसेच कोणत्याही गैरसमजास नागरिकांनी बळी पडू नये. लसीकरणाची संख्या मोठी असल्याने अधिकाधिक नागरिकांनी लवकरात लवकर अॅपवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इन्फो
रुग्णालयांना सेवेसाठी १०० रुपये
खासगी रुग्णालयात लस घेणाऱ्यांना ही लस २५० रुपयांना मिळू शकणार आहे. त्यासाठी शासनाने निर्धारीत हॉस्पिटल्सना ही लस १५० रुपयांना उपलब्ध करुन दिली आहे. संबंधित रुग्णालयाला लसीकरणाच्या प्रक्रीयेसाठी सेवा शुल्क म्हणून १०० रुपये आकारण्याची मुभा देण्यात आली आहे.
इन्फो
सामान्य लाभार्थी नागरीक
आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सव्यतिरिक्त असलेल्या ४५ ते ६० वयोगटातील ३९५ कोमाॅर्बिड रुग्णांनी गुरुवारी लस घेतली. तर ६० वर्ष वयोगटावरील २५७० नागरिकांनी दिवसभरात विविध शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये लस घेतल्याची नोंद झाली आहे.