मोक्षाबद्दलच्या संकल्पना विशद करण्याचा स्तुत्य प्रयत्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:11 AM2021-07-16T04:11:33+5:302021-07-16T04:11:33+5:30

नाशिक : प्रत्येकालाच मोक्षाबद्दल, मुक्तीबद्दल कुतुहल निर्माण होते, ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया नसेल ना असेही आपणास वाटणे स्वाभाविक आहे. ...

Commendable effort to explain the concept of salvation! | मोक्षाबद्दलच्या संकल्पना विशद करण्याचा स्तुत्य प्रयत्न !

मोक्षाबद्दलच्या संकल्पना विशद करण्याचा स्तुत्य प्रयत्न !

googlenewsNext

नाशिक : प्रत्येकालाच मोक्षाबद्दल, मुक्तीबद्दल कुतुहल निर्माण होते, ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया नसेल ना असेही आपणास वाटणे स्वाभाविक आहे. त्याच मोक्ष या संकल्पनेबरोबरच याच वाटेवरील वासना, अहंकार, राग, प्रेम, मौन, प्रार्थना, साधना अशा वेगवेगळ्या बाबी प्रवचनाच्या संवादी भाषेत मांडण्याचा सुंदर प्रयत्न ‘मन तरंग...मोक्षाचे’ या पुस्तकातून करण्यात आला असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी केले.

भोसला महाविद्यालयाच्या कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष व चार्टर्ड अकाउंटंट हेरंब गोविलकर यांच्या ‘मन तरंग... मोक्षाचे’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रकाश प्रभुणे महाराज, वेदमूर्ती सूर्यकांत राखे गुरुजी, ह.भ.प.चरोळीकर जोशी महाराज यांच्या हस्ते झाले. आगळावेगळा विषय हाताळल्याबद्दल डॉ. गोविलकर यांनी हेरंब गोविलकर यांचे अभिनंदन केले. साधक मग तो कुठलाही असो त्याला आपल्या जीवनात घडणाऱ्या विविध बाबींविषयी कुतुहल असते. आध्यात्मिक वाट निवडून आपली वाटचाल करणाऱ्या किंबहुना त्यासाठीच वाहून घेतलेल्या साधकाला पडणारे प्रश्न वेगळेच असतात. त्याचाच वेध या पुस्तकांतून घेण्यात आलेला आहे. स्वानुभव आणि मनुष्याला सतत पडणाऱ्या प्रश्नांवर एक मार्मिक भाष्य यातून झाले आहे. मोक्ष या संकल्पनेची उजळणी होऊन साधकाची निर्विकल्प साधना होण्यास मदत व्हावी, एवढी माफक अपेक्षा यातून दिसत असल्याचे डॉ. गोविलकर यांनी नमूद केले.

प्रभुणे महाराज म्हणाले, मन तरंग पुस्तक वाचल्याने त्यातून आपल्याला आत्मिक आनंद प्राप्त होतो. नावीन्यपूर्ण विषय निवडल्याबद्दल लेखकांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. केवळ पुस्तक लिहिणे हा यामागील उद्देश नसून साधकांला नियमित पडणाऱ्या प्रश्नांचा वेध त्यातून घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राजेंद्र सराफ यांनी ईशस्तवन सादर केले. हेरंब गोविलकर यांनी प्रास्ताविक केले. निखिल प्रभुणे यांनी सूत्रसंचालन केले.

कॅप्शन (१५गोविलकर)

चार्टर्ड अकाउंटंट हेरंब गोविलकर यांच्या मन तरंग...मोक्षाचे पुस्तक प्रकाशन करतांना अर्थतज्ञ डॉ. विनायक गोविलकर. समवेत प्रकाश प्रभुणे महाराज, वेदमूर्ती सूर्यकांत राखे गुरुजी, ह.भ.प.चरोळीकर जोशी महाराज, लेखक हेरंब गोविलकर, सार्थक गोविलकर आदी.

Web Title: Commendable effort to explain the concept of salvation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.