नाशकात करवाढीवर आयुक्त तुकाराम मुंढे ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 04:55 PM2018-04-28T16:55:27+5:302018-04-28T16:55:27+5:30

वॉक विथ कमिशनर : सुविधा हव्या असतील तर कर भरा

 Commissioner of Income Tax Tukaram Mundhe | नाशकात करवाढीवर आयुक्त तुकाराम मुंढे ठाम

नाशकात करवाढीवर आयुक्त तुकाराम मुंढे ठाम

Next
ठळक मुद्दे उपक्रमात २७ तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांनी काही तक्रारींची दखल घेत निराकरणाचे आश्वासन दिले तर काही तक्रारदारांचे दात त्यांच्याच घशात घालत घाम फोडण्याचेही काम चोखपणे बजावले स्टेप बाय स्टेपच करवाढ लागू केल्याची माहितीही आयुक्तांनी यावेळी देत करवाढ अटळ असल्याचे स्पष्ट केले.

नाशिक : ‘पॉप्युलर होणे माझ्यासाठी खूप सोपे आहे, परंतु मी शहराच्या सुखासाठी आलो आहे. कोणत्याही सुविधा मोफत मिळणार नाहीत. सुविधा हव्या असतील तर कर भरण्याची सवय लावून घ्या,’ असा सल्ला महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमात नाशिककरांना देत करवाढीबद्दल आपली भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, उपक्रमात २७ तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांनी काही तक्रारींची दखल घेत निराकरणाचे आश्वासन दिले तर काही तक्रारदारांचे दात त्यांच्याच घशात घालत घाम फोडण्याचेही काम चोखपणे बजावले.
गोल्फ क्लबवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी ६ ते ६.३० या वेळेत तक्रारदार नागरिकांना टोकन क्रमांकाचे वाटप झाल्यानंतर आयुक्तांनी मैदानावर उभारलेल्या छोटेखानी व्यासपीठावरून एकेक तक्रारींचा निपटारा करण्यास सुरुवात केली. मागील शनिवारी (दि.२१) झालेल्या उपक्रमात ७१ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या तर शनिवारी (दि.२८) २७ तक्रारदारांनी आपली गा-हाणी आयुक्तांच्या पुढ्यात मांडली. त्यामधील काही तक्रारींसंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकारीवर्गाला दिले तर काही तक्रारदारांना उलट सवाल करत नागरिकांच्या कर्तव्याचेही भान आणून देण्याचा प्रयत्न केला. याचवेळी, करवाढीचा मुद्दाही समोर आला असता आयुक्तांनी त्यावर आपली मते मांडताना सांगितले, नाशिकमध्ये मिळकत कराचे उत्पन्न हे अवघे ८२ कोटी रुपये आहे. तेच उत्पन्न पिंपरी चिंचवडचे ७५० कोटी तर ठाणे मनपाचे ३४० कोटी रुपये इतके आहे. त्यासाठीच कर सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. इमारत आणि जमीन यांच्यावर कायद्यानुसारच विचारपूर्वक करआकारणी करण्यात आलेली आहे. करदराला महासभेने मान्यता दिली आहे तर करयोग्य मूल्य निश्चित करण्याचे अधिकार आयुक्तांना आहे. महापालिकेकडे चारपेक्षा जास्त उत्पन्नाचे स्त्रोत नाहीत. सुविधा पाहिजे असतील तर त्यासाठी कर भरण्याची सवय लावून घेतली पाहिजे. इतक्या वर्षात करवाढ झालेली नाही. आता स्टेप बाय स्टेपच करवाढ लागू केल्याची माहितीही आयुक्तांनी यावेळी देत करवाढ अटळ असल्याचे स्पष्ट केले.
तक्रारदारांनाच सुनावले
तिडके कॉलनीतील मातोश्रीनगर येथे उद्यानातील खेळण्यांची दुरुस्तीची मागणी तक्रारदाराने केली असता, खेळण्या कोण तोडतो असा सवाल आयुक्तांनी केला. खेळण्या सांभाळण्याची जबाबदारी परिसरातील नागरिकांची आहे. घरातील व्यायामाचे साहित्य कसे टिकते, असा सवालही त्यांनी केला. गीता अपार्टमेंटमधील पार्किंगची समस्या समोर आली असता, आयुक्तांनी अनधिकृत पार्किंग असेल तर संपूर्ण इमारतीवरच कारवाई करू, असे तक्रारदारास सुनावले. प्रीमिअम दरवाढीचा प्रश्न घेऊन आलेल्या शेतकऱ्यालाही आयुक्तांनी खडसावले. आयुक्तांच्या या पवित्र्यामुळे टोकन क्रमांक जाहीर करूनही काही तक्रारदार समोर आले नाहीत.

Web Title:  Commissioner of Income Tax Tukaram Mundhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.