महापालिकेत आयुक्त राधाकृष्ण गमे साधणार समन्वय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 03:12 PM2018-12-06T15:12:40+5:302018-12-06T15:23:39+5:30
गेल्या फेब्रुवारी महिन्यात तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीनंतर गेल्या नऊ महिन्यात महापालिकेतील आणि शहरातील वातावरणही ढवळून निघाले होते. गेल्या महिन्यात मुंढे यांची बदली झाली असली तरी ती रद्द करण्यासाठी सुरू असलेले मार्चे, न्यायालयात जनहित दाखल करण्याची तयारी या पार्श्वभूमीवर अखेरीस उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती झाल्याने अनिश्चितता दुर झाली.
नाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीत निर्माण झालेल्या लोकप्रतिनिधी ाणि प्रशासन यांच्यातील बेबनावाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय ठेवून कामकाज करण्याचा मनोदय नुतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांंनी गुरूवारी (दि.६) सूत्रे स्विकारतानाच व्यक्त केला आहे. मुंढे यांची जनहिताचे निर्णय पुढे चालू ठेवण्यात येईल असे सांगतानाच त्यांनी आवश्यक त्या निर्णयात सुधारणा करण्याची तयारी दर्शविल्याने आता पालिकेत सामंजस्य पर्व अवतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या फेब्रुवारी महिन्यात तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीनंतर गेल्या नऊ महिन्यात महापालिकेतील आणि शहरातील वातावरणही ढवळून निघाले होते. गेल्या महिन्यात मुंढे यांची बदली झाली असली तरी ती रद्द करण्यासाठी सुरू असलेले मार्चे, न्यायालयात जनहित दाखल करण्याची तयारी या पार्श्वभूमीवर अखेरीस उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती झाल्याने अनिश्चितता दुर झाली. गमे यांनी गुरूवारी (दि.६) महापालिकेत आयुक्तपदाची सूत्रे स्विकारली. प्रभारी आयुक्त राधाकृष्णन बी हे केंद्र सरकारच्यावतीने दुष्काळी पहाणी दौऱ्यासाठी आलेल्या पथकाच्या कामात व्यस्त असल्याने अखेरीस गमे यांनी औपचारीक कार्यभार स्विकारला.
नाशिकमध्ये यापूूर्वी आपण काम केले असल्याने चांगला अनुभव आहे असे सांगून गमे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सर्वांशी समन्वय साधून काम करण्यात येईल असे सांगितले. त्याच बरोबर तुकाराम मुंढे यांचे निर्णय रद्द करण्याच्या सत्ताधिका-यांच्या मनोदयाबाबत विचारले असता त्यांनी मुंढे यांनी जनहिताचे जे निर्णय घेतले ते यापुढेही सुरूच राहातील तसेच ज्यात सुधारणा करण्याची गरज आहे, त्यात योग्य ती सुधारणा केली जाईल असे स्पष्ट केले. स्मार्ट सिटीच्या कामकाजाला गती देण्याची देखील तयारी असल्याचे ते म्हणाले.