निवडणूक प्रक्रिया सुरू असताना आयोगाचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 02:35 PM2018-02-10T14:35:20+5:302018-02-10T14:36:26+5:30
मुदत संपणा-या ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच थेट सरपंच निवडणूकी बरोबरच रिक्तपदांसाठी २५ फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करणा-या राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीची अधिसूचना जानेवारी महिन्यातच प्रसिद्ध केली होती.
नाशिक : मार्च ते मे महिन्यात मुदत संपणा-या राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होऊन प्रत्यक्षात नामांकन दाखल करण्याची अंतीम मुदत समीप आलेली असताना राज्य निवडणूक आयोगाने आपल्या ‘गोंधळी’ कारभाराची पुन: प्रचिती दिली असून, निवडणूकीचे नामांकनास मुदतवाढ देतानाच छाननीही लांबणीवर टाकल्यामुळे राज्यभरातील उमेदवार व निवडणूक अधिका-यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
मुदत संपणा-या ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच थेट सरपंच निवडणूकी बरोबरच रिक्तपदांसाठी २५ फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करणा-या राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीची अधिसूचना जानेवारी महिन्यातच प्रसिद्ध केली होती. आयोगाने घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार ५ ते १० फेब्रुवारी दरम्यान सकाळी अकरा ते दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान उमेदवारांनी आॅनलाईन नामांकन दाखल करण्याची मुदत दिली होती. १२ फेब्रुवारी रोजी छाननी तर माघारीसाठी १५ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अंतीम मुदत होती. मतदानासाठी २५ फेब्रुवारी व दुस-याच दिवशी मतमोजणी करून निवडणूक निकाल असा कार्यक्रम आयोगाने जाहीर करताना या निवडणुकीत राखीव जागांवर उमदेवारी करणा-या उमेदवारांनी नामांकनासोबत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य केले होते. आयोगाच्या या निर्णयामुळे राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणा-या उमेदवारांमध्ये चलबिचल निर्माण झाली होती, त्याचा परिणाम निवडणुकीचे नामांकन दाखल करण्यात झाला होता. आयोगाच्या या लहरी फतव्यामुळे उमेदवार निवडणुकीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाल्याने राज्य सरकारला त्यात हस्तक्षेप करावा लागला व मंत्रीमंडळ बैठकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली. राज्य सरकारचा हा निर्णय जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाने आपल्या निवडणूक अधिसुचनेत बदल केला. हे कमी की काय शनिवार दि. १० रोजी ग्रामपंचायतींचे नामांकन स्विकारण्याची अंतीम मुदत असताना आयोगाने शुक्रवारी रात्री आपल्या निवडणूक कार्यक्रमातच आश्चर्यकारकरित्या बदल केला.
नवीन निवडणूक कार्यक्रमानुसार आता सोमवार दि. १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत उमेदवारांना नामांकन दाखल करण्याची मुभा देण्यात आली असून, दि. १४ रोजी छाननी, १६ रोजी माघार व २७ फेब्रुवारी रोजी मतदान होऊन दुस-या दिवशी मतमोजणी केली जाणार आहे. आयोगाच्या या ऐनवेळच्या फतव्यामुळे निवडणूक अधिका-यांची धावपळ उडाली असून, शनिवार, रविवारी सुटी आल्याने ग्रामपंचायतींपर्यंत आयोगाचा कार्यक्रम कसा पोहोचवायचा असा प्रश्न पडला आहे.