उमराणे ग्रामपालिका निवडणुकीवर आयोगाचा "वॉच"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 10:24 PM2021-03-04T22:24:46+5:302021-03-05T00:42:45+5:30
उमराणे : दोन महिन्यांपूर्वी सरपंचपदाचा लिलाव व रामेश्वर मंदिर जीर्णोद्धार याबाबत वादग्रस्त ठरलेल्या उमराणे ग्रामपंचायतीसाठी नव्याने होत असलेल्या निवडणुकीच्या प्रत्येक हालचालींवर पोलीस प्रशासन व निवडणूक आयोगाकडून नजर ठेवली जात असून निवडणूक काळात आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना पोलीस प्रशासन व निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.

सहा वॉर्डातून १७ जागांसाठी १२ मार्च रोजी होत असलेल्या उमराणे ग्रामपंचायतीची निवडणूक अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रचार सभा, रॅली, जमाव आदिंवर निर्बंध घालण्यात आल्याने विकासकामांचा वचननामा, मागील काळात केलेली विकासकामे व निवडणुुकीचे केंद्रबिंदू असलेल्या रामेश्वर मंदिर जीर्णोद्धार विषयीची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सोशल मीडियावर झडू लागल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन व निवडणूक आयोग सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या संदेशांकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल व्ही.गायकवाड, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर व निवडणूक अधिकारी व्ही.जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक लढविणाऱ्या दोन्ही गटातील प्रमुखांसह कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. गावातील घडामोडींवर उमराणे बिटचे सहायक पोलीस उपनिरीक्षक ए.बी. फसाले, पोलीस हवालदार एम.बी. बच्छाव, वाय.एन. क्षीरसागर, के.आर. पवार, डी.एल. गायकवाड लक्ष ठेवून आहेत.
कठोर कारवाईचा इशारा
बैठकीत निवडणूक काळात धार्मिक भावना दुखावणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे, जमावबंदीचे उल्लंघन करणे, सोशल मीडियावर टीकात्मक संदेश व्हायरल करणे आदी बाबी टाळाव्यात अन्यथा सदर बाबींचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.