मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध : पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 01:06 AM2018-10-15T01:06:55+5:302018-10-15T01:07:26+5:30
मराठा समाजाला शंभर टक्के व कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध असून, येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत राज्य मागासवर्ग आयोग अहवाल सादर करणार आहे. अहवाल आल्यानंतर तत्काळ विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात ठराव करून मराठा समाजाला १६ टक्के कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळालेले असेल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले़
नाशिक : मराठा समाजाला शंभर टक्के व कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध असून, येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत राज्य मागासवर्ग आयोग अहवाल सादर करणार आहे. अहवाल आल्यानंतर तत्काळ विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात ठराव करून मराठा समाजाला १६ टक्के कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळालेले असेल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले़
दिंडोरीरोडवरील मेरी वसाहतीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते. ते म्हणाले की, मराठा समाजाला मिळणारे आरक्षण हे टिकणारे आरक्षण असणार आहे़ न्यायालयाच्या आदेशानुसार या आरक्षणासाठी आवश्यक असलेला मागासवर्ग आयोगाचा अहवाल वेळेत पूर्ण व्हावा यासाठी पुणे येथे सेवानिवृत्त न्यायाधीश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली वेगाने काम सुरू आहे.
येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत हा अहवाल प्राप्त होणार असून यानंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन घेऊन १६ टक्के आरक्षण दिले जाणार आहे़ यासाठी सरकारने निर्धारित कार्यक्रम आखला आहे़
मराठा समाजातील आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना ५० टक्के शैक्षणिक शुल्क माफ केले आहे़ तसेच प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींसाठी वसतिगृह उभारले जाणार असून कोल्हापूर, सांगली, नाशिक व औरंगाबाद याठिकाणी वसतिगृह सुरू झाले आहेत़ भाजपा सरकार मराठा आरक्षण देणार असल्याने विरोधकांची घालमेल सुरू झाली आहे़ मराठा आरक्षण हे राजकारणासाठी नाही तर जबाबदारी व बांधिलकी म्हणून देत असल्याचे पाटील यांनी सांगितले़
प्रास्ताविक सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार जगताप याने केले. यावेळी महापौर रंजना भानसी, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, अनिल कदम, डॉ. राहुल आहेर, माजी आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हा परिषदेच्या सभापती मनीषा पवार, उपमहापौर प्रथमेश गिते, मनपा स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, सुनील बागुल, लक्ष्मण सावजी आदींसह सकल मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार विनायक मेटे यांनी, मराठा आरक्षण, प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्जासाठीच्या अडचणी दूर करण्याची मागणी केली़ तसेच अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम २५ आॅक्टोबरपासून एल अॅण्ड टी कंपनी सुरू करणार असून, ते तीन वर्षांत पूर्णत्वास येणार असल्याचे मेटे म्हणाले़
४आरक्षणाचा उपयोग हा शिक्षण व नोकरीसाठी होत असून, मराठा समाजाला आरक्षणानंतर मिळणाऱ्या सुविधा या आरक्षणापूर्वीच देण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतलेला असल्याचे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
आणखी दोन इमारती
अधिग्रहित : महाजन
जलसंपदा तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, या वसतिगृहात १३० विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय झाली असून, आणखी दोन इमारती अधिग्रहित करून साडेतीनशे विद्यार्थ्यांची सोय केली जाणार आहे़ यामध्ये मुलींची संख्या १२५ असणार असून त्यांच्यासाठी स्वतंत्र वसतिगृह असणार आहे़ मराठा समाजाचे आरक्षण हे भाजपा सरकार उशिरा सत्तेत आल्याने रखडले होते़ मात्र ही प्रक्रिया आता वेगाने सुरू असून, डिसेंबरअखेर मराठा समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही दिली़