सेंट्रल किचन ठेकेदाराच्या चौकशीसाठी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 07:00 PM2019-12-07T19:00:56+5:302019-12-07T19:03:02+5:30

या समितीत दिनकर पाटील, कल्पना पांडे, संतोष साळवे व सुषमा पगारे यांचा समावेश आहे. सभापती निमसे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी स्थायी समितीची बैठक झाली. त्यात वडाळागावातील शाळेत विद्यार्थ्यांना शिळी खिचडी खाऊ घातल्याच्या मुद्द्यावरून सदस्यांनी सेंट्रल किचनच्या एकूणच कार्यपद्धतीतील

Committee for Central Kitchen Contractor Inquiry | सेंट्रल किचन ठेकेदाराच्या चौकशीसाठी समिती

सेंट्रल किचन ठेकेदाराच्या चौकशीसाठी समिती

Next
ठळक मुद्देउद्धव निमसे : मनपा स्थायी समितीच्या बैठकीत निर्णयमहिला बचत गटामार्फतच पोषण आहार पुरविण्यात यावा,

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : वडाळागावातील शाळेत विद्यार्थ्यांना निकृष्ट खिचडी दिल्याच्या घटनेचे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत तीव्र पडसाद उमटून जवळपास सर्वच सदस्यांनी सेंट्रल किचनचा ठेका रद्द करून पुन्हा महिला बचत गटामार्फतच पोषण आहार पुरविण्यात यावा, अशी आग्रही मागणी केली. सेंट्रल किचनबाबत सदस्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत सभापती उद्धव निमसे यांनी चार सदस्यीय उपसमितीमार्फत सेंट्रल किचनप्रणालीची तपासणी करण्याचे आदेश दिले. येत्या आठ दिवसांत या समितीने चौकशी करून अहवाल देण्याची मुदत देण्यात आली. त्याचबरोबर वडाळागावातील ठेका रद्द करण्याचे आदेशही त्यांनी दिले.


या समितीत दिनकर पाटील, कल्पना पांडे, संतोष साळवे व सुषमा पगारे यांचा समावेश आहे. सभापती निमसे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी स्थायी समितीची बैठक झाली. त्यात वडाळागावातील शाळेत विद्यार्थ्यांना शिळी खिचडी खाऊ घातल्याच्या मुद्द्यावरून सदस्यांनी सेंट्रल किचनच्या एकूणच कार्यपद्धतीतील अनागोंदीबाबत तक्रार केली. सेंट्रल किचनऐवजी पुन्हा बचत गटांनाच काम देण्याची मागणी सदस्यांनी केली. गोरगरीब महिलांचे काम काढून धनदांडग्यांना सेंट्रल किचनचा ठेका देण्यात आल्याचा आरोप दिनकर पाटील यांनी केली. वडाळागावातील घटनेला शिक्षणाधिकारी देवीदास महाजन हेच जबाबदार असून, त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही सदस्यानी केली. मनमानीपणे कामकाज करणाऱ्या सेंट्रल किचनच्या ठेकेदाराला कोणाचा आशीर्वाद आहे त्याची चौकशी करण्यात यावी, असे सुषमा पगारे यांनी म्हटले, तर सेंट्रल किचनच्या माध्यमातूनच आहार पुरवठ्याचे निर्देश न्यायालयाने दिले असले तरी गोरगरिबांच्या मुलांना शिळे अन्न खाऊ घालावे, असे न्यायालयाचे मुळीच म्हणणे नसल्याने महिला बचत गटांनाच सेंट्रल किचनचा ठेका द्यावा, अशी सूचना संतोष साळवे यांनी मांडली. अशोक मुर्तडक यांनी शिक्षण विभागातील अनागोंदीकडे लक्ष वेधले. सेंट्रल किचनचा ठेका रद्द करून पूर्ववत महिला बचत गटांमार्फत खिचडी शिजवण्याची मागणी कल्पना पांडे यांनी केली. सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन सभापती निमसे यांनी सेंट्रल किचनच्या कारभाराची तपासणीसाठी चार सदस्यीय उपसमिती गठीत करण्यात येत असल्याचे जाहीर केले. शिक्षणाधिकारी महाजन यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह या समितीबरोबर सेंट्रल किचनची तपासणी करावी. या उपसमितीने आठ दिवसात अहवाल सादर करावे, असे आदेश यावेळी सभापतींनी दिलेत. तत्पूर्वी शिक्षणाधिकारी महाजन यांनी वडाळागावातील खिचडीबाबत स्पष्टीकरण दिले. सदर प्रकरणाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर तत्काळ शाळेत जाऊन खिचडीच्या दजार्बाबत पाहणी केली असून अन्न व औषध प्रशासन विभागाकडे खिचडीचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवालात दोषी आढळल्यास संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात येईल, असेही महाजन यांनी स्पष्ट केले.

Web Title: Committee for Central Kitchen Contractor Inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.